संज्योती कांबरी यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार
रायगड: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
रोहा तालुक्यातील माणिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सौ. संज्योती संतोष कांबरी यांना रायगड जिल्हा परिषदेचा 2025 सालचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेची आणि समाजभान जपणाऱ्या कार्याची दखल घेऊन हा मानाचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे.कांबरी गेल्या 18 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या कारकिर्दीचा प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अध्यापन हे केवळ
व्यवसाय नाही, तर समाजसेवेचे साधन आहे, या भावनेतून त्यांनी आपले शिक्षकपद स्वीकारले. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार देत त्यांनी त्यांचे जीवन उजळवले आहे.2007 साली जिल्हा परिषद सेवेत रुजू झालेल्या संज्योती कांबरी यांनी सुरुवातीला खालापूर, नंतर कर्जत, त्यानंतर रोहा तालुका, आणि सध्या माणिवली येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यापनशैलीत सर्जनशीलता, मूल्याधारित विचार आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते याचा सुंदर मेळ आहे. त्या एम.ए., बी.एड., पदवीधर असून सतत नवनवीन अध्यापन पद्धतींचे प्रयोग करतात.
कांबरी यांनी शालेय शिक्षणाचा स्तर वाढवायला सातत्याने योगदान दिले आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, संस्कृती संवर्धन, विज्ञान प्रदर्शन आणि पालक प्रबोधन उपक्रमांद्वारे त्यांनी शाळेला समाजाशी जोडले. शिक्षकांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि गुणनिधी प्रतिभा हे त्यांच्या कार्याचे द्योतक आहे.
विशेष म्हणजे, त्याचे पती संतोष कांबरी यांनाही रायगड जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला होता. त्यामुळे हे शिक्षक दांपत्य रायगड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना संज्योती कांबरी म्हणाल्या की; शिक्षक असणे ही माझ्यासाठी नोकरी नाही, तर आयुष्याचे ध्येय आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशात माझा आनंद आहे. हा पुरस्कार माझ्या कार्याची पोचपावती असून, तो मला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.त्यांच्या या सन्मानानंतर मनिवली गावांसह संपूर्ण कर्जत तालुक्यात आनंदाचे वातावरण’ आहे. शिक्षक, पालक, सहकारी आणि स्थानिक नागरिक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला दिशा आणि प्रेरणा मिळत असून, त्या शिक्षण क्षेत्रातील खऱ्या अर्थाने प्रेरणादायी शिक्षिका ठरल्या आहेत.