आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

डोह अणि कोसला हे मराठी ललितगद्यामध्ये नवे शैलीभान आणणारे लेखन : प्रा.डॉ. हिमांशू स्मार्त

समाजवादी प्रबोधिनीच्या वाचनालयाच्या वतीने  व्याख्यान

डोह अणि कोसला हे मराठी ललितगद्यामध्ये नवे शैलीभान आणणारे लेखन : प्रा.डॉ. हिमांशू स्मार्त समाजवादी प्रबोधिनीच्या वाचनालयाच्या वतीने  व्याख्यान :

इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क :

मराठी साहित्यविश्वाला अपरिचित असणारे जीवनदर्शन भालचंद्र नेमाडे आणि श्रीनिवास कुलकर्णी या दोन्ही लेखकांनी वाचकाला घडवले. महाराष्ट्राच्या दोन भिन्न सांस्कृतिक-सामाजिक परिवेषात राहणार्‍या व्यक्तित्वांचा स्वशोध, हा या दोन्ही लेखकांमधील दुवा आहे.’ डोह हे मराठी ललितगद्यामध्ये नवे शैलीभान आणणारे लेखन आहे आणि कोसला ही मराठी कथनशैलीला अभूतपूर्व वळण देणारी कादंबरी आहे,असे मत ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी प्रा. डॉ. हिमांशू स्मार्त यांनी व्यक्त केले. ते “डोह आणि कोसला “या विषयावर बोलत होते.महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांना “साहित्य भूषण “आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना “विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

 डॉ. हिमांशू स्मार्त पुढे म्हणाले,निसर्ग आणि माणुस यांच्यातल्या अनुबंधाचा शोध, श्रीनिवास कुलकर्णी ज्या तरल तत्वप्रधानतेमधून घेतात त्यामुळेच त्यांचे ललितगद्य मराठीतील अनन्य ठरते. नेमाडेंच्या एकूणच लेखनामध्ये असणारे संस्कृतीशोधाचे आणि मानवी संबंधांच्या विकासक्रमाचे भान देणारे भान त्यांना श्रेष्ठ लेखक बनवते, स्मार्त यांनी, श्रीनिवास कुलकर्णी आणि भालचंद्र नेमाडे यांच्या योगदानाचा परामर्ष घेतला. यावेळी त्यांनी, डोहमधील अंशांचे आणि नेमाडेंच्या कवितांचे अभिवाचनही सादर केले.

प्रारंभी युद्धामध्ये बळी गेलेल्या निष्पापांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच जागतिक शांतता निर्माण झाली पाहिजे ही भूमिका ही मांडण्यात आली. यावेळी आपटे वाचन मंदिरला मराठी भाषा संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार डॉ सुजित सौंदत्तीकर, अशोक केसरकर, जयप्रकाश साळगावकर यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व जयकुमार कोले डॉ. दिलीप कुलकर्णी , प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. या व्याख्यानास रसिक स्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??