चौपट भरपाईचा निर्णय झाल्याशिवाय मोजणी नाही राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचा इशारा:

चौपट भरपाईचा निर्णय झाल्याशिवाय मोजणी नाही – राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचा इशारा:
जयसिंगपूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे व मजले येथे कर्मचारी मोजणीला येण्यापूर्वीच शेतकर्यांनी भूमिअभिलेख कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलनास सुरुवात करून कर्मचार्यांना कार्यालयात सोडले नाही. अखेर तहसिलदार सुशिल बेलेकर, भूमिअभिलेखचे उपअधिक्षक जयदीप शितोळे यांच्याकडून कोणताही तोडगा न निघाल्याने उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकर्यांशी बैठक घेवून चर्चा केली. यात मोजणी रद्द केल्याचे सांगून लवकरच जिल्हधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. तसेच चौपट भरपाईचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही मोजणीला हात लावू देणार नाही असा इशारा राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला.
याबाबत अधिक माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या गावातील महामार्गासाठी जमिनी मोजण्याच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकरी सकाळीच 9 वाजता हातकणंगले येथील भूमिअभिलेख कार्यालयात ठिय्या मारला. त्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी हे आंदोलन थांबवण्याची मागणी केली. मात्र, शेतकर्यांनी मोजणी थांबेपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर तहसिलदार सुशिल बेलेकर यांनी घटनास्थळी भेट देवून उपजिल्हाधिकारी यांना याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले, महसूल मंत्र्यांच्या दालनात बैठक होवूनही अद्याप चौपटीबाबत निर्णय झालेला नाही. असे असताना आपल्याकडून बेकायदेशीरपणे मोजणी होत आहे. याला आमचा विरोध आहे. चौपटचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोजणी करू देणार नाही असे त्यांनी सांगितले. यावर उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी सदरची मोजणी रद्द केल्याचे सांगत लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासमोर बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ.अभिजीत इंगवले, सुरेश खोत, किरण जामदार, अमित पाटील, दिपक वाडकर, अविनाश कोडोले, सुधाकर पाटील, मिलींद चौगुले, प्रतिक मुसळे, शिलवंत बिडकर, आनंदा पाटील, जयकुमार दुघे, सचिन मगदूम, अजित रणनवरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


