त्रिभाषा धोरण समितीकडे आपले मत,अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन : सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन

त्रिभाषा धोरण समितीकडे आपले मत,अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन
सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन समितीची संवाद बैठक दि. १ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या संवाद बैठकीचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव असून त्यांच्यासह मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सुरू होणार आहे. या अनुषंगाने नियोजन बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने, कोणत्या इयत्तांमध्ये व प्रादेशिक पातळीवर कशी करायची यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील बैठकीत समिती सामान्य नागरिक, भाषाशास्त्रज्ञ, शिक्षक, शासकीय व अशासकीय शिक्षणसंस्था प्रतिनिधी, निवृत्त शिक्षक, साहित्यिक, पत्रकार आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी अशा विविध घटकांशी संवाद साधणार आहे.
त्रिभाषा धोरणासंदर्भात इच्छुक नागरिक व संस्थांनी आपले मते किंवा अभिप्राय ऑनलाइन नोंदवण्यासाठी tribhashasamiti.mahait.org या संकेतस्थळाचा उपयोग करावा, तसेच या सोबत मतावली/प्रश्नावली देण्यात आलेली आहे. आपणास त्याव्दारे आपले मत लेखी स्वरूपात देता येईल. समितीच्या दौऱ्यादरम्यान मतावली/प्रश्नावली च्या झेरॉक्स प्रती उपलब्ध करून दिल्या जातील, त्याव्दारेही आपले मत/अभिप्राय नोंदवता येईल. असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त सर्व अभिप्रायांचा विचार करून अंतिम शिफारसी राज्य सरकारकडे सादर केल्या जाणार आहेत.


