महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ कर्तव्यपथावर सज्ज

महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ कर्तव्यपथावर सज्ज
नवी दिल्ली :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्ण तयारीने सज्ज झाला आहे. ‘स्वातंत्र्याचा मंत्र: वंदे मातरम’ आणि ‘समृद्धीचा मंत्र: आत्मनिर्भर भारत’ या प्रमुख संकल्पनांवर आधारित एकूण ३० चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ हा चित्ररथ राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे आणि आर्थिक क्षमतेचे प्रतीक घेऊन अवतरेल.युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या सान्निध्यात हा चित्ररथ संचलित होईल.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुजवलेली सामाजिक एकात्मता आणि स्वावलंबनाची चळवळ आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी जोडली गेल्याचे या चित्ररथातून प्रभावीपणे मांडले जाईल.चित्ररथावर ढोल-ताशा वाजवणाऱ्या महिला, गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार, विसर्जनासाठी निघालेल्या भक्तांची मिरवणूक आणि अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार, फुलव्यापारी आणि इतरांना मिळणारा शाश्वत रोजगार तसेच पर्यावरणपूरक सजावटीमुळे उदयास येणारी आर्थिक साखळी हे मुख्य आकर्षण आहे.महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिल्याने हा उत्सव सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या अधिक व्यापक झाला आहे. राज्य महोत्सव म्हणून पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन पथसंचलनात स्थान मिळाल्याने महाराष्ट्रभरात उत्साह संचारला असून, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष कर्तव्यपथावर घुमणार आहे.या चित्ररथामुळे महाराष्ट्राची लोककला, ढोलताशा पथके, वारसा आणि आधुनिकता यांचा संगम देशभर पोहोचेल.



