ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी वन विभागातील वाघाच्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा, वनविभागाचे स्पष्टीकरण:

 बनावट आणि भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा वनविभागाचा इशारा

ब्रह्मपुरी वन विभागातील वाघाच्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा, वनविभागाचे स्पष्टीकरण-

बनावट आणि भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा वनविभागाचा इशारा:

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर सध्या वाघाने विश्रांतीगृहात एका व्यक्तीवर हल्ला करत ठार केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ही घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.४२ वाजता घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ब्रह्मपुरी वन विभागात अशा स्वरूपाची घटना घडलेली नाही, असे स्पष्ट करीत चंद्रपूरच्या मुख्य वनसंरक्षक (पर्यायी) आर.एम. रामानुजम यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे या घटनेचा इन्कार केला आहे.मुख्य वनसंरक्षकांनी स्पष्ट केले आहे की, अशा कुठल्याही हल्ल्याची नोंद ब्रह्मपुरी वन विभागात झालेली नाही.

समाजकंटकांकडून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये भीती आणि संभ्रम पसरवण्यासाठी अशा गोष्टी पेरल्या जात असल्याचे विभागाने म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आला असून, नागरिकांनी अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच, या प्रकरणाची दखल घेत वन विभागाने तपास सुरू केला असून, अशा बनावट आणि भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी असे कोणतेही व्हिडिओ अथवा अफवा आढळल्यास वन खाते किंवा पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.(स्रोत : चंद्रपूर वन विभागाचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५)

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??