वाडी रत्नागिरी पंचायत समिती वार्तापत्र: नेत्यांची सौभाग्यवतींच्या साठी लागणार फिल्डिंग.लढत दुरंगी की तिरंगी याकडेदेखील लागल्या नजरा.

वाडी रत्नागिरी पंचायत समिती वार्तापत्र: नेत्यांची सौभाग्यवतींच्या साठी लागणार फिल्डिंग.लढत दुरंगी की तिरंगी याकडेदेखील लागल्या नजरा.
पन्हाळा /एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सध्या ज्याप्रमाणे हिवाळ्याची चाहूल लागली आहे त्याचप्रमाणे पन्हाळा तालुक्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण देखील पेट घेत आहे. तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे जिल्हा परिषद गटातील वाडी रत्नागिरी पंचायत समिती गण हा नेहमीच लक्षवेधी ठरला आहे. या पंचायत समिती गणात मागील दोन निवडणुकांत तरी जनसुराज्य शक्ती पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघातून आमदार विनय कोरे कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर विरोधात कोण उमेदवार असणार याचीदेखील उत्सुकता मतदार संघात लागून राहिले आहेत. दरम्यान वाडी रत्नागिरी पंचायत समिती गण हा नागरिकांच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तिकीट कोणालाही मिळो पण नेत्यांना आपल्या सौभाग्यवतींच्यासाठीच फिल्डिंग लावावी लागणार आहे हे मात्र निश्चित झाले आहे. त्यातच ऐनवेळी उमेदवाराच्या संख्या वरून निवडणूक दुरंगी की बहुरंगी याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे.
वाडी रत्नागिरी पंचायत समिती गणामध्ये वाडी रत्नागिरी कुशिरे, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी, पिंपळे तर्फ सातवे, जगदाळेवाडी, बुधवारपेठ, आपटी,जेऊर,बादेवाडी,वैखंडवाडी,आंबवडे,नावली,मिठारवाडी, सोमवारपेठ आदी गावे येतात. या मतदारसंघात आमदार कोरे यांनी अनिल कंदुरकर यांच्या रूपाने पन्हाळ्याच्या बांधारीला न्याय दिलाच आणि याला मतदारसंघातील लोकांनी देखील मोलाची साथ देत विनय कोरे यांच्या शब्दाचा मान राखला. सध्या या मतदारसंघात कोरे विरुद्ध बाबासाहेब पाटील आसुर्लेकर या पारंपारिक गटातच लढत रंगणार हे जवळपास निश्चित आहे.
बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचादेखील या मतदारसंघात घर टू घर संपर्क असल्याने मजबूत पकड आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. तिरंगी झालेल्या मागच्या निवडणुकीत अनिल कंदुरकर यांनी विजयश्री खेचून आणली खरी; पण विरोधी उमेदवार असलेले शिवाजीराव सांगळे यांनी देखील काट्याची टक्कर दिली. तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विश्वासराव पाटील यांनी देखील चांगले मतदान घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. यामध्ये विश्वास पाटील यांनी आमदार कोरे यांची साथ घेतल्याने या मतदारसंघात जनसुराज्यची ताकद वाढली आहे. मात्र बाबासाहेब पाटील यांनी चांगला जनसंपर्क ठेवल्याने या पंचायत समितीच्या मतदारसंघात पुन्हा एकदा टाईट फाईट पहावयास मिळेल. सध्यातरी जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची चर्चा जोरात सुरू असून जो तो जिल्हा परिषदचे तिकीट पदरात पाडण्याच्या प्रयत्नात आहे.तरी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर गटाकडून उर्मिला शिवाजीराव सांगळे, छाया निवास ढोले तर भाजपकडून पूनम सचिन शिपुगडे यांची नावे समोर येत आहेत. जनसुराज्यकडून देखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण असे असले तरी हा मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नेत्यांना आपल्या सौभाग्यवतींच्यासाठीच फिल्डिंग लावावी लागणार हे मात्र निश्चित.



