दिल्लीतील स्फोट प्रकरणी पोलिसांनी दोन तासाच्या आत एका संशयिताला घेतले ताब्यात:
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आज सायंकाळी घडलेल्या भीषण स्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन तासाच्या आत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
या बाबत माहिती अशी की,सायंकाळी 6.55 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळच्या पार्किंग भागात एका कारमध्ये जबरदस्त स्फोट झाला.स्फोटानंतर लगेचच पार्किंगमधील काही गाड्यांना आग लागली.या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली, पोलिसांनी त्वरित सुरक्षा व्यवस्था सुरू केली. दिल्लीत स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी केला.दोन तासांच्या आत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.स्फोटात वापरण्यात आलेली आय-ट्वेन्टी कार हरियाणातील असून गुरुग्रामचे वाहन क्रमांक आहे. या ठिकाणी एन एस जी कमांडोसुद्धा दाखल झाले आहेत.
दरम्यान सकाळीच हरियाणातील फरिदाबादमध्ये पोलिसांनी कारवाई करत सात दहशतवाद्यांना अटक करून त्यांच्याकडून 350 किलो स्फोटके जप्त करण्यात आलीअसून यातील काही दहशतवादी व संशयितांचा दिल्लीत झालेल्या स्फोटाशी संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे.फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ही कारवाई झाली असून तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.संशयितांत दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सर्व प्रकारच्या शक्यतांवर योग्य दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. ही घटना अजूनही तपासाच्या प्राथमिक टप्प्यात असून, दहशतवादी किंवा इतर घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या घटनेनंतर देशभरातील पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.