संजीवनचे (कोल्हापूर विभाग) राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत दुहेरी यश : मुलांमध्ये संजीवन विद्यालय तर मुलींमध्ये संजीवन विद्यानिकेतनला अजिंक्यपद

संजीवनचे (कोल्हापूर विभाग) राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत दुहेरी यश : मुलांमध्ये संजीवन विद्यालय तर मुलींमध्ये संजीवन विद्यानिकेतनला अजिंक्यपद
कोल्हापूर:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.
अमरावतीत झालेल्या राज्यस्तरीय शालेय १४ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये पन्हाळा येथील संजीवन विद्यालयाच्या मुलांच्या तर संजीवन विद्यानिकेतनच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदाला गवसणी घातली. ही स्पर्धा अमरावतीतील पोलीस ग्राऊंड व सायन्स कोअर ग्राउंड येथे पार पडली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र व अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूर विभागासह, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा आठ विभागांमधील मुला-मुलींच्या प्रत्येकी ८ शालेय संघांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर विभागातर्फे पन्हाळा येथील संजीवन विद्यालयाच्या मुलांच्या तर संजीवन विद्यानिकेतनच्या मुलींच्या संघाने स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.
मुलांच्या गटातील स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात संजीवन विद्यालयाच्या संघाने नागपूर विभाग संघाचा ५-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे विभाग संघाने मुंबई विभाग संघावर २-० गोल विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली होती. संजीवन विद्यालय व पुणे विभाग संघ यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यावर वर्चस्व ठेवत संजीवनच्या संघाने पुणे संघाला गोल करण्याची संधीच दिली नाही. तसेच आपल्या मिळत राहिलेल्या संधीचा फायदा उठवत संजीवनने पुणे संघाला ४-० गोलने मात देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रेयस कोरवी,बिकाशसिंग लौरेमबम,पुनशिबा खोमद्राम प्रद्युत पारठे,थोय लवरेबम,जॅक्सन यूंनाम,सार्थक हवलदार,अनुज कातवरे,ओम कुराडे,केदार भोसले,पार्थ खावरे,पियुष गायकवाड,लिबरसन नावरेम, प्रीत भोसले, वीर पाटील, वेदांत माळी,शुभंकर भाट्ये,रणवीर जाधव. यांचा विजयी संघात सहभाग होता.

मुलींच्या गटातही पन्हाळा येथील संजीवन विद्यानिकेतनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात बाजी मारली. अंतिम फेरीतही पुणे संघावर मात देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. उपांत्य सामन्यात संजीवन विद्यानिकेतनने अमरावती विभाग संघाला २-१ ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाशिक विभाग संघाने छत्रपती संभाजीनगर संघावर मात केली होती. त्यामुळे अंतिम सामना संजीवन विद्यानिकेतन व नाशिक विभाग संघ यांच्यात झाला. या सामन्यातही संजीवन विद्यानिकेतनच्या संघाने नाशिक संघाला गोल करण्याची संधी दिली नाही. तसेच आपल्या मिळालेल्या संधीचा फायदा उठवत संजीवनने नाशिक संघाला ३-० ने मात देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. संजीवन विद्यानिकेतनच्या संघातून सिद्धी देसाईने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक गोल नोंदवले. सिद्धी देसाईने स्पर्धेत एकूण ७ गोल नोंदवत उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.मुलींच्या संघात रेवा सोनवणे कर्णधार, प्रणाली पवार,अनुश्री जाधव, अनुष्का कटके, अपूर्वा नाळे, आराध्या जाधवर, हृतिका पवार, निशिता चनू ,पूजा गोवाला,बंधना राम मोहन,मनस्वी माने, माही वायफळकर लिमचिंबी, श्रावणी जाधव, श्रेया भागवत, यांचा समावेश होता.
दोन्हीही विजयी संघांना संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, कार्यकारी संचालक सौरभ भोसले, प्राचार्य महेश पाटील, के. के. पोवार, क्रीडा शिक्षक जयंत कुलकर्णी व सागर पाटील, फुटबॉल प्रशिक्षक अमित साळुंखे व नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



