पंडित नेहरू आधुनिक भारताचे रचनाकार – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

पंडित नेहरू आधुनिक भारताचे रचनाकार – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
कुरुंदवाड : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टी आणि आधुनिक भारताच्या उभारणीत मोठे योगदान आहे.त्यांनी देशाची दिशा निश्चित करण्यासाठी लोकशाही धर्मनिरपेक्षता, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक भारताची पायाभरणी केली. राष्ट्रीय आणि सामाजिक विकास ,आर्थिक आणि कृषी विकास ,साम्राज्यवाद विरोध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे नेहरू प्रमेयाचे महत्त्वाचे पैलू होते. त्या आधारे त्यांनी भारताची राष्ट्रबांधणी केली.असे प्रतिपादन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले. ते येथील शतकोत्तर रौप्य महोत्सवी नगरवाचनालयात पद्मश्री पां.वा.गाडगीळ व डॉ.स.रा.गाडगीळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित शरद व्याख्यानमालेत ” पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचे श्रेष्ठत्व ” या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अ.शा. दानवाडे होते.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू यांनी सोळाव्या वर्षाच्या कार्यकाळात आधुनिक भारताचा पाया रचला. ज्यामध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी विचारांना महत्त्व दिले होते. शांततापूर्ण परराष्ट्र धोरण पंचशील तत्वे आणि अविकसित देशांमधील एकतेवर त्यांनी भर दिला होता. तसेच औद्योगिकीकरण, शेती विकास आणि शिक्षण या क्षेत्रांना प्रोत्साहन दिले होते. तसेच देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर दिल्यामुळे अवकाश संशोधन, अणुऊर्जा आणि इतर क्षेत्रात भारताची प्रगती झाली. देशाच्या औद्योगिक विकासासाठी त्यांनी मोठा हातभार लावला आणि शेती समृद्धीसाठी धरणे बांधली.यासारख्या योजनांना प्रोत्साहन दिले. तिसऱ्या जगातील नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. जेणेकरून ते आर्थिक आणि सामाजिक समस्यावर सामूहिक मात करू शकतील. स्थिर लोकशाही देशासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. ज्यांचा प्रभाव आजही भारताच्या राजकीय व्यवस्थेवर दिसतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, पंडित नेहरू भारतातील एक वसाहत विरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि महत्वाचे इतिहासकार, विचारवंत,लेखक होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविले. संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर मोठा प्रभाव पडला. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटापासून मुक्त केले. पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर १९२० च्या दशकात पुरोगामी गटाचे आणि काँग्रेसचे ते नेते बनले. त्यांना पुढे महात्मा गांधींचे समर्थन प्राप्त झाले. पुढे गांधीजींनी नेहरू यांना राजकीय वारसा म्हणून नियुक्त केले. १९२९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून नेहरूंनी ब्रिटिश राजवटी पासून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. १९३० च्या दशकात नेहरु आणि काँग्रेसचे वर्चस्व होते. नेहरूनी १९३० च्या भारतीय प्रांतीय निवडणुकांमध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या कल्पनेला चालना दिली. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळवता आला. आणि काँग्रेसने अनेक प्रांतात सरकारे स्थापन केली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकवला.त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय सुधारणांचे महत्त्वाचे कार्यक्रम सुरू केले. नेहरूंनी बहुलवादी, बहुपक्षीय लोकशाहीचा पुरस्कार केला. १९६२ च्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव होऊनही नेहरू भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय राहिले. स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे उपकार्याध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सावगावे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार कार्याध्यक्ष अ.शा. दानवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक दातार यांनी तर शेवटी आभार प्रा. भाऊसाहेब सावगावे यांनी मानले. या व्याख्यानमालेला विनया घोरपडे, जयपाल बलवान, सदाशिव सुभेदार, कुतुबुद्दीन दानवाडे, मलाप्पा प्रधाने, सदानंद पाटील, मोनाप्पा चौगुले, शशिकांत पाटील, दत्ता भोसले, मेघा पाटील, भीमराव चिंचवाडे या मान्यवरासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



