अखेर ती अफवा खरी ठरली! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांचे लग्न औपचारिकरीत्या रद्द ; दोघांनी सोशल मीडियावरून दिला भावूक निरोप

अखेर ती अफवा खरी ठरली! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांचे लग्न औपचारिकरीत्या रद्द ; दोघांनी सोशल मीडियावरून दिला भावूक निरोप
मुंबई/सांगली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारतीय महिला क्रिकेटची स्टार सलामीवीर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा हिटमेकर संगीतकार पलाश मुच्छल यांची प्रेमकहाणी अखेर संपुष्टात आली. सांगलीत डोळ्यांसमोर उभ्या राहिलेल्या भव्यदिव्य लग्नाचा सोहळा आता कायमचाच रद्द झाला आहे. दोघांनीही स्वतःच्या इंस्टाग्रामवरून हात जोडून भावूक पोस्ट टाकल्या आणि चाहत्यांना, माध्यमांना एकच विनंती केली, ‘‘आता आमच्या खाजगी आयुष्यात डोकावू नका.’’

स्मृतीने लिहिले, ‘‘गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होणारी चर्चा मला आणि माझ्या कुटुंबाला असह्य झाली आहे. आता मी फक्त माझ्या क्रिकेटवर लक्ष देणार. कृपया माझ्या खाजगी जीवनाचा आदर करा. मी मैदानात बॅट उचलणार, तुम्ही फक्त चौकार-षटकार गणतील, एवढीच अपेक्षा आहे.’’
पलाश मुच्छल तर थेट इशारा देऊन गेला. ‘‘हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण टप्पा आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण सोशल मीडियावर चाललेले बेसलेस आरोप, स्क्रीनशॉट्स आणि बदनामी आम्ही सहन करणार नाही. यापुढेही असे निराधार मजकूर पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल.’’

महिनाभरापूर्वी सांगलीत प्री-वेडिंग शूट, दोन्ही क्षेत्रांतील सेलिब्रिटींची हजेरी, लग्नाची तारीख ठरलेली… सगळं काही परीकथेसारखं वाटत होतं. मग अचानक ‘स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे लग्न पुढे ढकललं’ अशी बातमी, नंतर मात्र अफवांचा पूर. बेबनावाचे आरोप, तिसऱ्याची एण्ट्री अशा सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या. अखेर आज दोघांनीही स्पष्ट शब्दांत सांगितलं, ‘‘लग्न रद्द झालं आहे. पूर्णविराम.’”



