ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन ; महाराष्ट्रात शोककळा

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन ; महाराष्ट्रात शोककळा
पुणे : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या असंघटित कामगार चळवळीचे शिल्पकार, हमाल पंचायतचे संस्थापक आणि ‘एक गाव – एक पाणवठा’ आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (वय ९५) यांचे आज सकाळी साडेदहा वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
१९३० मध्ये पुण्यात जन्मलेल्या डॉ. भाई वामनराव आढाव उर्फ बाबा आढाव यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडून श्रमिकांच्या प्रश्नांना वाहून घेतले. १९५५ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘हमाल पंचायत’ने पुण्यातील हजारो हमाल, माथाडी, रिक्षाचालक आणि असंघटित मजुरांना संघटित करून किमान वेतन, ओळखपत्र, विमा आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क मिळवून दिले. त्याचबरोबर शहरी कामगार चळवळीबरोबरच ग्रामीण महाराष्ट्रातील दलित-बहुजनांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘एक गाव – एक पाणवठा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली. ही चळवळ महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते.
सामाजिक न्याय, श्रमिक हक्क आणि जातिविरोधी लढ्यांसाठी त्यांनी शेकडो सत्याग्रह, उपोषणे आणि मोर्चे काढले. कित्येक वेळा तुरुंगवासही भोगला; पण मागे कधी हटले नाहीत. साधेपणा आणि तळागाळातील माणसांबरोबरचे जवळचे नाते हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार संघटना, सामाजिक चळवळी आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राने आपला एक खंबीर आणि निष्कलंक समाजसुधारक गमावला असून. बाबा आढाव यांचे कार्य आणि विचार पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असे अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.



