धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक घोडदौड -१७ दिवसातच केली ८७० कोटींची कमाई, वर्षातला नंबर-१ चित्रपट

‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक घोडदौड -१७ दिवसातच केली ८७० कोटींची कमाई, वर्षातला नंबर-१ चित्रपट
मुंबई: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाचा झंजावात बॉक्स ऑफिसवर जोरदार वेगाने घोंगावत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज माध्यमावर येणाऱ्या रील्समधून ज्यांनी चित्रपट पाहिला नाही अशांनाही हा चित्रपट पाहिल्याची पाहण्याची उत्सुकता वाढत आहे तसेच ; ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांच्याकडून होणार्या माऊथ पब्लिसिटीद्वारे या चित्रपटाची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे यामुळेच या चित्रपटाने आजपर्यंत बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केलेली असून येत्या काही दिवसात यापूर्वीच्या यशस्वी चित्रपटांचे रेकॉर्ड हा चित्रपट ब्रेक करेल अशी चिन्हे दिसत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ए (प्रौढ) प्रमाणपत्र असूनही, काही टीकांना तोंड देत, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या १७ दिवसांतच वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. देशभक्ती, गुप्तहेर कथानक आणि तगड्या अॅक्शन सीनची सांगड असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेने वर्षाचा ‘धुरंधर’ परफॉर्मर ठरलेला आहे.
५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या आठवड्यात तोंडी प्रचाराच्या जोरावर अभूतपूर्व गती धरली. ‘प्रोपगंडा फिल्म’ अशा टीकांना दुर्लक्षित करत प्रेक्षक थिएटरकडे धावू लागले. परिणामी, फक्त पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने २१८ कोटी रुपयांची कमाई करून दमदार सुरुवात केली.
दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा जोर थांबला नाही व जवळपास २६१.५ कोटींची कमाई करण्यात यश मिळाले. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही ‘अवतार ३’ सारख्या जागतिक चित्रपटाच्या छायेतही आपली छाप उमटवली.
अखेरच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर’ने जागतिक स्तरावर एकूण ८७० कोटींपेक्षा अधिक कमाई केली असून तो ‘छावा’ आणि ‘कांतारा चॅप्टर १’ यांना मागे टाकून वर्षातला नंबर वन चित्रपट बनला आहे.
ए प्रमाणपत्र असलेला चित्रपट इतक्या वेगाने १००० कोटींच्या टप्प्याकडे झेप घेणे ही भारतीय चित्रपटसृष्टीतली एक नवी भरारी ठरत आहे. येणाऱ्या काळातील ख्रिसमस व नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.पुढील काही दिवसांतच ‘धुरंधर’ १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल असा कयास सिने अभ्यासकांकडून वर्तवला जात आहे.
रणवीर सिंहच्या अभिनयासोबतच खलनायक म्हणून अक्षय खन्ना याचा तगडा अभिनय, सर्वच कलाकारांचे योगदान. सुंदर संगीत साज व कथानकातील प्रखर देशभक्तीची भावना, अप्रतिम स्टंट आणि थरार यामुळे प्रेक्षक थिएटरमध्ये खिळून राहत आहेत. प्रचंड यशामुळे आता ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागाबद्दलचीही उत्सुकता वाढली आहे. निर्मात्यांकडूनही पुढील भागाचे संकेत मिळाल्याने चित्रपटप्रेमी पुढील भागाचीही आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.



