सर्वोच्च न्यायालयाकडून अरावली पर्वतरांगेच्या व्याख्येसंदर्भात नवीन तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून अरावली पर्वतरांगेच्या व्याख्येसंदर्भात नवीन तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वत आणि अरावली पर्वतरांगेच्या व्याख्येसंदर्भात 20 नोव्हेंबर रोजी दिलेल्या स्वतःच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती (अबेयन्स) दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी व ए. जी. मसीह यांच्या सुटीतील खंडपीठाने अरावली व्याख्येशी संबंधित विविध मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी नवीन तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.आजच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, यापूर्वी स्वीकारलेल्या व्याख्यांबाबत काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे, म्हणून 20 नोव्हेंबरच्या निकालातील दिशा-निर्देश पुढील आदेशापर्यंत अमलात आणू नयेत. न्यायालयाने म्हटले आहे की व्याख्येतील काही बाबींची स्पष्टता होणे गरजेचे असून त्या दृष्टीने नव्या तज्ज्ञ समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरेल. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकार आणि अरावली पट्ट्यात येणारी चारही राज्ये – राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि हरियाणा – यांना नोटीस बजावत त्यांचे लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वतरांगेच्या नव्या व्याख्येमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय आणि कायदेशीर चिंतेवर स्वतःहून (suo motu) दखल घेतली होती.
पर्यावरणवादी संघटना आणि विरोधी पक्षांकडून या नव्या व्याख्येचा नाजूक असलेल्या पर्वतीय परिसंस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. केंद्र सरकारने अरावली पर्वतरांगेची नवी व्याख्या 100 मीटर किमान उंची या निकषावर आधारित करून अधिसूचित केली असून, 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्या व भाग व्याख्येबाहेर राहण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.दरम्यान, 24 डिसेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अरावली परिसरात कोणत्याही नव्या खाण पट्ट्यांना (मायनिंग लीज) मंजुरी देण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश सर्व संबंधित राज्यांना दिले आहेत.ही बंदी संपूर्ण अरावली पट्ट्यात एकसमानपणे लागू राहणार असून, अनियंत्रित व अवैज्ञानिक खाणकामाला आळा घालून या संवेदनशील पर्वतरांगेची भू-रचना आणि पर्यावरणीय अखंडता जपणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यमान खाणींसाठी कठोर पर्यावरणीय अटींचे पालन आणि अधिक काटेकोर देखरेखीचे निर्देशही राज्य शासनांना देण्यात आले आहेत.

अरावली पर्वतरांग ही देशाच्या उत्तर-पश्चिम भागात सुमारे 670 ते 700 किलोमीटरपर्यंत पसरलेली प्राचीन पर्वतरांग आहे. ही रांग दिल्ली जवळ सुरू होऊन दक्षिण हरियाणा आणि राजस्थान मार्गे गुजरातपर्यंत जाते आणि उत्तर भारतात थार वाळवंटाचा विस्तार पूर्वेकडे होऊ न देणारा नैसर्गिक भिंत-सदृश अडसर म्हणून कार्य करते. राजस्थानातील माउंट आबू येथे असलेले गुरुशिखर हे 1,722 मीटर उंचीसह या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. अरावली ही भारतातील सर्वात जुनी फोल्ड-माऊंटन पर्वतरांग मानली जाते आणि तिचा भूगर्भीय इतिहास सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातो.त्यामुळेच या बाबतीत सर्व पर्यावरण प्रेमींचे लक्ष या घडामोडींकडे लागून राहिलेले आहे.



