सोशल मीडियावरील अश्लीलतेला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे कडक निर्देश.

सोशल मीडियावरील अश्लीलतेला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे कडक निर्देश.
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सोशल मीडियावर वाढत चाललेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह मजकुरावर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. अशा प्रकारचा कंटेंट रोखण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स( ट्विटर) अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील, लैंगिक स्वरूपाचा, महिलांविरोधी, मुलांसाठी हानिकारक किंवा कायद्याने प्रतिबंधित मजकूर प्रसारित होऊ नये, याची जबाबदारी थेट कंपन्यांवर टाकण्यात आली आहे. अशा मजकुराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत तो हटवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेषतः वैयक्तिक गोपनीयतेचे उल्लंघन करणारे फोटो, व्हिडीओ किंवा मजकूर, तसेच लैंगिक छळाशी संबंधित पोस्ट्स यावर तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आयटी नियम २०२१ अंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम कराव्यात आणि वापरकर्त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.
जर कंपन्यांनी या निर्देशांकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना केवळ आयटी कायद्याचे संरक्षण गमवावे लागणार नाही, तर भारतीय न्याय संहिता आणि इतर फौजदारी कायद्यांनुसार गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर थांबवण्यासाठी आता कंपन्यांना अधिक जबाबदारीने काम करावे लागणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर पसरत असलेल्या अश्लील आणि बेकायदेशीर मजकुरावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे



