संजीवन विद्यालय व संजीवन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न :निसर्ग जपण्याचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश:

संजीवन विद्यालय व संजीवन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न :
निसर्ग जपण्याचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश:
पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन शिक्षण समूहाच्या संजीवन विद्यालय व संजीवन पब्लिक स्कूल या दोन्ही प्रशालांचे वार्षिक स्नेहसंमेलन “जीवो जीवस्य जीवनम् ” या अभिनव संकल्पनेवर सादर करण्यात आले.
या संकल्पनेतून निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून तो जपण्याची जबाबदारी सर्व समाज घटकांची आहे.म्हणूनच आपणां सर्वानीच निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असा संदेश देत गीत,संगीत नृत्याविष्कार व नाट्याद्वारे प्रभावीपणे उलगडून दाखवणारी विविध गुणदर्शनाची मेजवानी रसिक-पालकांना विद्यार्थ्यानी दिली. अद्ययावत ध्वनी, प्रकाश यंत्रणेने सजलेल्या व गीत संगीताने रंगलेल्या या उत्साहवर्धक कार्यक्रमाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली.
यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या विविध कलाविष्काराचे प्रदर्शन करीत मालवणी गाऱ्हाणे, बाळूमामा यांची भाकणुक अशा विविध उदाहरणाद्वारे मानव व वन्यप्राणी यांचा संघर्ष आणि याचे मूळ असणारी मानवाची भोगवादी वृत्ती व त्याचे दुष्परिणाम यांची सुंदर कथाबीजात गुंफण करत शेवटी निसर्ग हाच मानवाचा तारणहार आहे म्हणून ही सुंदर सृष्टी जपूया असा निश्चय करत वृक्षारोपणाचा सक्रिय संदेश देत असतानाच कार्यक्रमाच्या अखेरीस पालकांकडून स्वयंस्फूर्तीने जमा झालेली शेकडो झाडे संजीवनच्या प्रांगणात रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुमारे अडीच तास सर्व उपस्थितांना जागेवर खिळवून ठेवणार्या या सोहळ्याचा शुभारंभ दोन्ही प्रशालांचे यावर्षीचे आदर्श विद्यार्थ्यी अजिंक्य पाटील व वेदिका कदम यांचे पालक व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संजीवन हे आमच्या पाल्यांचे संस्कारकेंद्र आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे कृतज्ञतापूर्ण उद्गार पालकांनी काढले. याप्रसंगी संजीवन समूहाचे संस्थापक अध्यक्ष पी.आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, सचिव जी. एन. खराडे संचालक आर. डी. कांडगावकर, श्रीकांत घाटगे, , एम.एस.लोहार,आर.आर. भोसले, किरणकुमार साळोखे, क्रीडा संचालक सौरभ भोसले,ऋषिकेश भोसले, संजीवनच्या विविध ज्ञानशाखांचे प्राचार्य महेश पाटील, के.के. पोवार, बी.आर.बेलेकर, पी.एन.पाटील,शिल्पा पाटील- सांगावकर यांच्यासह सर्व विद्यार्थी-पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गांजवे व महेंद्र कुलकर्णी यांनी केले.



