आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करिता संभाजीराजे छत्रपती ‘दावोस’ला रवाना : पोलंड देशाचे विशेष निमंत्रण

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करिता संभाजीराजे छत्रपती ‘दावोस’ला रवाना : पोलंड देशाचे विशेष निमंत्रण

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या दावोस येथील वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पोलंड या देशाने युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित केले आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम अंतर्गत सेंटर फॉर इंटरनेशनल रिलेशन्स, पोलंड या संथेने आयोजित केलेल्या “लीडर्स फोरम” या सत्राच्या उद्घाटन समारंभास संभाजीराजे छत्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभास संभाजीराजे यांच्यासह पोलंडचे उपपंतप्रधान श्री. रॅडोस्लाव सिकॉर्स्की, पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्निएव राऊ, युरोपियन युनियनचे संरक्षण व अंतराळ विषयक आयुक्त अँड्रियस क्युबिलियस, युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक श्री. जोसेफ आशबाखर व लिक्टेनस्टाइनचे राजपुत्र हिज हायनेस प्रिन्स मायकेल यांच्यासह युरोप, आशिया, आफ्रिका आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वरिष्ठ मंत्री, खासदार, जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नामवंत अभ्यासक सहभागी होणार आहेत.

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ही स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्था दरवर्षी दावोस येथे वार्षिक परिषद आयोजित करते. या परिषदेस विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आंतरराष्ट्रीय बँकांचे प्रमुख, जागतिक कंपन्यांचे प्रमुख आणि नामवंत तज्ञ सहभागी होतात. याठिकाणी आरोग्य, जागतिक अर्थव्यवस्था, युद्ध–शांतता, तंत्रज्ञान, उद्योग व जागतिक गुंतवणूक हे प्रमुख चर्चेचे विषय असतात. आंतरराष्ट्रीय धोरण समन्वय आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने दावोस परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

 या परिषदेअंतर्गत ‘लीडर्स फोरम पॉवर्ड बाय पोलंड’ या सत्रास संभाजीराजे छत्रपती प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करणार असून त्यांच्यासोबत पोलंडचे माजी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर क्वाश्न्येव्हस्की आणि न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क हे देखील प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर जागतिक राजकारण, जागतिक व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहकार्य या विषयांतील जागतिक स्तरावरील तज्ञ विद्वान, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांसोबत उच्चस्तरीय पॅनेल चर्चेत देखील प्रमुख अतिथी म्हणून संभाजीराजे सहभागी होणार आहेत.

 याबद्दल प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले, हा केवळ माझा अथवा छत्रपती घराण्याचा सन्मान नसून महाराष्ट्र व संपूर्ण भारतासाठी प्रतिष्ठेचा व अभिमानास्पद प्रसंग आहे. इतिहास, संस्कृती व विश्वासावर उभ्या असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे हे प्रतीक आहे. मानवता, जबाबदारी व विश्वासावर आधारित भारताची भूमिका जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

 राज्यसभा कारकिर्दीत संभाजीराजेंनी अनेक देशांत व जागतिक परिषदांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी अनेक देशांशी त्यांचे राजनैतिक संबंध निर्माण झाले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंड देशातील पाच हजार निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने राजाश्रय दिलेला होता. या मदतीची जाणीव आजही या देशाने ठेवलेली आहे. संभाजीराजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज भारत व पोलंड संबंध जागतिक स्तरावर मजबूत झालेले आहेत. यामध्ये संभाजीराजे यांनी बजावलेल्या भूमिकेचा सन्मान म्हणून पोलंड सरकारने २०२२ साली त्यांना ‘बेणे मेरिटो’ या सन्मानित किताबाने गौरविले आहे. केवळ इतक्यावर न थांबता हे संबंध पुढेही वृद्धिंगत करण्यासाठी पोलंड देश उत्सुक असून संभाजीराजे यांना दिलेले विशेष निमंत्रण हे त्याचेच प्रतिबिंब आहे.

दावोस येथील या जागतिक परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांचा सहभाग हा भारत – युरोप संबंधांमधील महत्त्वाचा घटक ठरणार असून ऐतिहासिक विश्वास, मानवतावादी मूल्ये आणि नैतिक नेतृत्वाच्या बळावर आधुनिक जगाचे राजकारण, सांस्कृतिक संवाद आणि भारत व विशेषत: महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक अधिक दृढ करण्यास निश्चितच पूरक ठरेल. यामुळे भारतासह महाराष्ट्राची जागतिक स्तरावरील भूमिका अधिक प्रभावीपणे अधोरेखित होऊन, भारत–पोलंड तसेच भारत–युरोप संबंधांना नवे बळ आणि दिशा मिळणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??