सामाजिक विषमता आणि वास्तव मांडणी हाच साहित्यिकांचा उद्देश : विठ्ठल वाघ
शिरोळ येथे ११ वे 'दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन' उत्साहात संपन्न

सामाजिक विषमता आणि वास्तव मांडणी हाच साहित्यिकांचा उद्देश : विठ्ठल वाघ
शिरोळ येथे ११ वे ‘दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन’ उत्साहात संपन्न
शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.
“साहित्य हे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ते समाजाचे खरे प्रतिबिंब असावे, शेतकऱ्यांचे कष्ट, सामाजिक विषमता आणि जळजळीत वास्तव मांडणे हेच साहित्याचे मुख्य उद्देश आहे.” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि संमेलनाध्यक्ष विठ्ठल वाघ यांनी केले. शिरोळ येथे शब्दगंध साहित्य परिषद आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती ११ व्या साहित्य संमेलनात ते बोलत होते.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील दत्ताजीराव कदम सभागृहासमोर स्व.दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन संपन्न झाले. प्रारंभी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या निवासस्थानापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
विठ्ठल वाघ यांनी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, हुंडाबळी, अंधश्रद्धा आणि सिंचनातील विषमता समाजातील वास्तव यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून परखड मत केले यावेळी त्यांनी आजच्या साहित्यिकांनी केवळ शब्दाची जुळवा जुळव न करता समाजाचे प्रतिनिधित्व करणारी साहित्य निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगत स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला.
संमेलनाचे उद्घाटक डॉ.अनिल मडके यांनी लेखकांना समाजातील घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करून ‘ब्लॅक बॉक्स’ प्रमाणे नोंदी ठेवण्याचे आवाहन केले. अरिस्टॉटलच्या ‘यूडिमोनिया’ संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी साहित्यातून आनंद मिळवण्याचे मार्ग सुचवले. तसेच, तरुणांमधील व्यसनाधीनता, बदलती जीवनशैली, फास्ट फूडमुळे उद्भवणारे कॅन्सर आणि पीसीओडीसारखे आजार यांवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

प्रारंभी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन करण्यात आले. पद्माराजे विद्यालयातील विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर संजय सुतार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दगडू माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेचे भाई दिनकररावजी यादव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री नीलम माणगावे (जयसिंगपूर), यांना व जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रीय कबड्डीपटू सौरभ इंगळे (शिरोळ) यांना प्रदान करण्यात आला. समाजभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. दगडू माने, मानवतावादी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार सौ जयश्री पाटील यांना मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
या संमेलनात साहित्यिक मेजवानीसोबतच विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये प्रिन्स सुनील पाटील, महेश निकम,ॲड. सुरेश जमखंडी, डॉ. सुनील पाटील, डॉ. राजश्री पाटील, डॉ. संजीव कुलकर्णी, प्रा. वसंत काळे आणि प्रा. डॉ. उदयकुमार लाड यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या संमेलनातून समाज परिवर्तन, शेतकरी समस्या आणि व्यसनमुक्तीचा प्रबळ संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री पाटील, किरण पाटील यांनी केले, आभार सचिन इनामदार यांनी मानले.
यावेळी शिरोळच्या नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक अनिलराव यादव, दरगु गावडे, शेखर पाटील, इंद्रजीत पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार, सचिव शंतनू यादव, सदस्य अविनाश उर्फ पांडुरंग माने, यांच्यासह शिरोळ पालिकेचे सन्माननीय पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर माजी सैनिक, वारकरी संप्रदाय, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्य संमेलनात दुसऱ्या सत्रात साहित्यिका सौ. विजया बन्ने यांचे एकटीची वरात या कथेवर कथाकथन झाले. तर रावसाहेब भोसले यांनी संस्कार संस्कृतीची ऐशी तैशी याविषयी विचार व्यक्त केले.तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे बहारदार कवी संमेलन संपन्न झाले. यानंतर समारोप सत्रात नव कवींसाठी संजय सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कवी कट्टा पार पडला यामध्ये अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
शिरोळ परिसरातील शेकडो साहित्यप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थिती लावून साहित्याचा आनंद लुटला.



