आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

शिरोळ तालुक्यात जि.प.व पं.स.निवडणुकीसाठी ७१ %४७ टक्के मतदान 

जि.प.च्या २४ व पं.स.च्या ४२ उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद

शिरोळ तालुक्यात जि.प.व पं.स.निवडणुकीसाठी ७१ %४७ टक्के मतदान 

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ जागा व पंचायत समितीच्या १४ जागेच्या निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मात्र चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. २ लाख ४० हजार १०२ मतदारांपैकी१ लाख ७१ हजार ५९० इतक्या मतदारांनी मतदान केल्याने तालुक्यात ७१.४७ टक्के मतदान झाले आहे. निवडणुक प्रशासनाकडून तालुक्यातील २३२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासाठी १ हजार १६२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २३२ शिपाई व २३२ पोलीस कर्मचारी असे एकूण १६२४ कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेत होते. रात्री उशिरा येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात मत पेट्या ठेवण्यात आल्या.

शिरोळ तालुक्यात दानोळी, उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल लाट, यड्राव, नांदणी या जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २४ उमेदवार तर तालुक्यातील दानोळी, कोथळी, उदगाव, अर्जुनवाड, गणेशवाडी, आलास, दत्तवाड, सैनिक टाकळी, अब्दुल लाट, अकिवाट, यड्राव, शिरढोण, नांदणी, चिपरी, या पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४२ असे एकूण ६६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण २ लाख ४० हजार १०२ मतदार आहेत. यामध्ये महिला – १ लाख २० हजार ८२७, पुरुष १ लाख १९ हजार २७३ व तृतीयपंथी २ असे मतदार आहेत. शनिवारी पुरुष ८८०७३ तर स्त्री ८३५१७ मतदारांनी मतदान केल्यामुळे तालुक्यात एकूण १ लाख७१ हजार५९० इतके मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांना अभिवादन करीत होते. अपंग, वृद्ध नागरिक,महिला, तरुण यांनीही मतदानात प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेऊन लोकशाहीचा उत्सव बळकट केला. उमेदवारांचे समर्थक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दिवसभर प्रयत्न करीत होते. लांबच्या अंतरावर असणाऱ्या मतदारांसाठी उमेदवारांनी वाहनांची सोय केली होती. 

अनेक मतदान केंद्रावर उमेदवार आणि त्यांचे समर्थकात शाब्दिक बाचाबाची होण्याचे प्रकार झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव निवळण्याचा प्रयत्न केला.

 शनिवारी मतदान प्रक्रियेच्या पहिल्या दोन तासात सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुरुष १२६२१ व महिला ८३४३ असे २०९६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामुळे या दोन तासात ८.७३% मतदान झाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत पुरुष २९४७२, महिला २३६०५ असे ५३०७७ इतक्या मतदारांनी मतदान केल्याने २२.११% मतदान झाले. दुपारी दीड वाजता पुरुष ४४५५५ , व महिला ४३०१४ असे एकूण

८७५६९ मतदारांनी मतदान केल्याने ३६.४७ % मतदान झाले.दुपारी ३.३० वाजेपर्यंत पुरुष ६१८६३ आणि महिला ६३२९३ असे एकूण १२५१५६ मतदारांनी मतदान केल्याने ५२.१३% मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुरुष ८८०७३ आणि महिला ८३५१७ असे १ लाख७१ हजार५९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे शिरोळ तालुक्यात एकूण ७१ % ४७इतके मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रथम मौजे आगर येथील मत पेट्या प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात आणण्यात आल्या.

निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्रण पारदर्शक शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे. मतदान काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान सोमवार दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जि.प. व पं.स. मतमोजणीस प्रारंभ होणार . मतमोजणीसाठी १४ टेबल व पोस्टलसाठी ७ टेबलावर मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलसाठी ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणीच्या एकुण १९ फेऱ्या होणार आहेत . सुरुवातीला जिल्हा परिषद मतदान यंत्र चालू करण्यात येणार आहे त्यातच पंचायत समितीचीही मत मोजणीही होणार आहे . दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व जागेचे निकाल पुर्ण होतील. अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??