कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली डॉ. विजय राठोड कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात प्रशासकीय फेरबदल; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली डॉ. विजय राठोड कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात प्रशासकीय फेरबदल; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.
मुंबई: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राज्य प्रशासनाने नवीन आर्थिक वर्षाच्या मुहूर्तावर प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल केले असून, एकाच झटक्यात २५ भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूरसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले असून, काही प्रमुख महानगरपालिकांमध्येही नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मोठ्या फेरबदलात कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदावर महत्त्वाचा बदल झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता डॉ. विजय राठोड कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. २०१४ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या डॉ. राठोड यांनी यापूर्वी जालना जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीमध्ये सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तर अमोल येडगे यांची पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
केवळ जिल्हाच नव्हे, तर राज्यातील प्रमुख महापालिकांचे ‘बॉस’देखील बदलले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी पदी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली असून सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील या घाऊक बदल्यांमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही फेररचना अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नवीन अधिकारी आता आपापल्या जिल्ह्यांत कोणत्या विकासकामांना आणि आव्हानांना प्राधान्य देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.



