ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगलीत वादळाचा हाहाकार; मंदिराची भिंत कोसळून दोन मुलांसह सहा भाविकांचा करुण अंत

सांगलीत वादळाचा हाहाकार; मंदिराची भिंत कोसळून दोन मुलांसह सहा भाविकांचा करुण अंत

जत : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सांगली जिल्ह्यावर सोमवारी सायंकाळी निसर्गाचा कोप झाला. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त जमलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी ज्या मंदिराच्या भिंतीचा आसरा घेतला, तीच भिंत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सीमाभागावर मोठी शोककळा पसरली आहे.

​मोटेवाडी परिसरात सध्या मरगुबाई देवीच्या यात्रेचा उत्साह सुरू होता. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वेगवान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी देवीच्या दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू झाली.

​अनेक भाविकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मंदिराच्या शेजारी असलेल्या एका चिरा-विटांच्या कच्च्या भिंतीचा आसरा घेतला. मात्र, वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, शेजारील पत्रा उडून या भिंतीवर पडला आणि त्याच क्षणी संपूर्ण भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मृतांमध्ये कर्नाटक राज्यातील डोमनाळ (विजयपूर) येथील अरुण विष्णू गेजगे (१४), सोन्या लक्ष्मण गेजगे (१४) आणि सांगली जिल्ह्यातील दारिबडची येथील कोंडीबा राऊबा गेजगे (६५) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

​या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्यासाठी धाव घेतली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालय आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने मोटेवाडीत दाखल झाले. पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या यात्रेचा अंत असा भीषण होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

nynavabharatnews.live

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??