आधी स्वतःचे ‘राज’शाही दौरे थांबवा, मग जनतेला उपदेश पाजा; राज ठाकरेंचा मोदींवर थेट हल्ला!
केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी आणि सडेतोड टीका

आधी स्वतःचे ‘राज’शाही दौरे थांबवा, मग जनतेला उपदेश पाजा; राज ठाकरेंचा मोदींवर थेट हल्ला!
मुंबई: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
“लालबहादूर शास्त्रींनी स्वतः कृती करून देशाला आवाहन केले होते, तुम्ही मात्र शेकडो गाड्यांच्या ताफ्यात फिरता आणि जनतेला सोन्या-डिझेलची काटकसर करायला सांगता? हा कसला न्याय?” अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनातील विसंगतीवर बोट ठेवले आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या नावाखाली देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे खापर जनतेवर फोडण्याचे ‘नॅरेटिव्ह’ सेट केले जात असल्याचा घणाघाती आरोप राज यांनी केला आहे. ‘सामना’ स्टाईलने या पत्राचा समाचार घेताना, राज यांनी थेट मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून आणि निवडणुकीतील ‘रेवड्यां’वरून केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या वापरात काटकसर करण्याचे जे आवाहन केले आहे, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी आणि सडेतोड टीका केली आहे. इराण-इस्रायल युद्धाचे निमित्त करून जनतेवर आर्थिक ओझे लादण्यापूर्वी स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी आपला विलासी ताफा आणि फुलांची उधळण थांबवणार का, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. पंतप्रधानांच्या या भूमिकेला राज यांनी ढोंगीपणाचा आरसा दाखवत, आधी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करा आणि मग जनतेला उपदेश द्या, अशा शब्दांत सुनावले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, खनिज तेलाचे भाव १०० डॉलर्सवर जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळातही कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते, मात्र तेव्हा जनतेला असा उपदेश कोणी दिला नव्हता. उलट ६०-६५ डॉलर्स भाव असतानाही सरकारने चढ्या दराने पेट्रोल विकून जनतेकडून जो लाखो कोटींचा महसूल गोळा केला, तो पैसा नक्की गेला कुठे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. युद्धाचे निमित्त करून रुपयाचे अवमूल्यन आणि कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे खापर इतरांवर फोडू नका, असेही राज यांनी ठणकावून सांगितले आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘रेवडी संस्कृती’वरही राज ठाकरेंनी कडाडून हल्ला चढवला. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, महिलांना सक्षम करण्याऐवजी त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि महागाईच्या रूपाने तेच पैसे पुन्हा वसूल करायचे, हा कोणता अर्थतज्ज्ञपणा आहे? निवडणुकीच्या प्रचारात कोट्यवधी लिटर इंधन आणि अफाट पैसा जाळताना पंतप्रधानांना काटकसरीची आठवण का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, परदेश दौऱ्यांचे जे सत्र सुरू आहे, त्यावरही त्यांनी निशाणा साधला. १५ मे पासून सुरू होणारे पाच देशांचे दौरे रद्द करून लालबहादूर शास्त्रींप्रमाणे कृतीतून आदर्श निर्माण करण्याची हिम्मत पंतप्रधान दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.
शेवटी, अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगताना राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे की, आता केवळ ‘मन की बात’ करून भागणार नाही, तर खऱ्या अर्थतज्ज्ञांचे ऐकण्याची वेळ आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी राजीनामे का दिले आणि परकीय गुंतवणूकदार भारत सोडून का जात आहेत, याचे उत्तर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून या आर्थिक गोंधळावर स्पष्टीकरण द्या, अशी मागणी करत त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही तुमचे शत्रू नाही, पण जनतेला वेठीस धरणाऱ्या धोरणांवर प्रश्न विचारणे आम्ही थांबवणार नाही. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का, हा राज ठाकरेंचा सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.



