आपला जिल्हाक्राईम न्युजताज्या घडामोडी

मरळीत ऊसाच्या फडात गांजाची शेती; २५ किलो साठ्यासह शेतकऱ्याला अटक.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

मरळीत ऊसाच्या फडात गांजाची शेती; २५ किलो साठ्यासह शेतकऱ्याला अटक.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

कोल्हापूर /पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरळी गावाच्या शिवारात ऊसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २५ किलो वजनाचा ओला गांजा जप्त केला असून, बाजारभावानुसार याची किंमत अडीच लाख रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी भिकाजी शिवा पाटील या संशयित शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मरळी येथील भिकाजी पाटील याने आपल्या अर्ध्या एकर ऊसाच्या शेतात ऊसाच्या आडोशाला गांजाची लागवड केली होती. बाहेरून पाहिल्यास केवळ ऊसाचे पीक दिसत असले तरी, आतमध्ये त्याने गांजाची आठ झाडे लावली होती. ही झाडे पूर्णपणे वाढलेली होती. या गांजाची तो किरकोळ विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या आमिषाने त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

​स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने सोमवारी संबंधित शेतात सापळा रचून छापा टाकला. यावेळी पोलिसांना ऊसाच्या फडाच्या मध्यभागी गांजाची मोठी झाडे डोलताना आढळली. पोलिसांनी ही सर्व झाडे मुळासकट उपटून जप्त केली आहेत. आरोपीने या झाडांची जोपासना करण्यासाठी आणि ती कोणाच्या नजरेस पडू नयेत यासाठी विशेष काळजी घेतल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

​या कारवाईमुळे पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ऊस पिकाच्या आड अशा प्रकारे अंमली पदार्थांची शेती केली जात असल्याने पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत. संशयित भिकाजी पाटील हा गेल्या किती दिवसांपासून हा व्यवसाय करत आहे आणि त्याचे धागेदोरे आणखी कोणाशी जोडले गेले आहेत का, याचा तपास कळे पोलीस करत आहेत. जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, अशा प्रकारे अवैध कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??