ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रसाद कुलकर्णी यांची राज्यस्तरीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड 

प्रसाद कुलकर्णी यांची राज्यस्तरीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड 

इचलकारंजी :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर येथे रेणुका गझल मंचच्या वतीने होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी यांची निवड झाली आहे. हे संमेलन रविवार ता.१७ मे २०२६ रोजी होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ गझलकार बापू दासरी ( नांदेड) हे आहेत. 

या संमेलनाला प्रमुखपाहुणे म्हणून डॉ.शेख इक्बाल मिन्ने (छ.संभाजीनगर ) आणि प्राचार्य सतीश देवपूरकर (पुणे) हे लाभले आहेत. या संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये संजय पवार (छ.संभाजीनगर),गौतम सुर्यवंशी (परभणी ) ,रेखा तांबे (वडोदरा),डॉ. राज रणधीर (जालना), बाळासाहेब गिरी (नाशिक), सुवर्णा मुळजकर (परभणी),डॉ. प्रशांत पाटोळे(पुणे) अंजली दीक्षित पंडित (छ.संभाजीनगर )प्रतिभा विभूते (पुणे) यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील गझलकार सहभागी होणार आहेत.असे रेणुका गझल मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर (छ.संभाजीनगर)आणि समन्वयक आत्माराम कदम ( मुंबई )संयोजन समितीचे कार्याध्यक्ष शैलेंद्र भणगे, अध्यक्ष संजय पवार आणि कोषाध्यक्ष दत्तात्रय ठुबे यांनी जाहीर केले आहे.

या गझल संमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी हे १९८५ सालापासून समाजवादी प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते असून विद्यमान सरचिटणीस आहेत. गेली सदतीस वर्षे प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.तीस पुस्तके, पुस्तिका आणि तीन हजारांवर लेख यासह त्यांचे एकूण वीस हजारांवर छापील पृष्ठांचे लेखन प्रकाशित आहे.साहित्य, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक ,संस्कृतिक अशा विविध विषयांवर एक हजाराहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. ते कवी, गझलकार म्हणूनही सुपरिचित आहेत.१९८५ पासून मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाखाली ते गझल लेखन करत आहेत. अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते यापूर्वी वक्ता, कवी,गझलकार म्हणून अनेकदा सहभागी झाले आहेत. त्यांचे तीन गझलसंग्रह प्रकाशित असून त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर ‘एक रविवार : एक गझल ‘ हा उपक्रम गेली सहा वर्षे सातत्याने सुरू आहे.तसेच ते ब्लॉगर म्हणून सुपरिचित असून ब्लॉगवर त्यांचे साडेआठशेवर लेख आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ सतत कार्यरत असलेल्या प्रसाद कुलकर्णी यांना साहित्य व समाजकार्य यासाठी भाई माधवराव बागल पुरस्कारापासून कैफी आझमी पुरस्कारापर्यंत छत्तीसहून अधिक राज्यस्तरीय,पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??