आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

प्रचंड परिश्रम व अथक प्रयत्नांतून संजीवनची जडणघडण: डॉ. पी.आर. भोसले

संजीवनतर्फे वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव 

प्रचंड परिश्रम व अथक प्रयत्नांतून संजीवनची जडणघडण: डॉ. पी.आर. भोसले 

संजीवनतर्फे वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव 

पन्हाळा : प्रसाद जाधव /एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील संजीवन शिक्षण समूहाचा 32 वा वर्धापन दिन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. सोहळ्याचा शुभारंभ सकाळी सत्यनारायण पूजेने झाला. 

 सायंकाळी वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा शुभारंभ सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि स्वागतगीताने झाला. यानंतर स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन.आर.भोसले यांनी यापुढे दरवर्षी संजीवनच्या 10 कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा व एका सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले केले.तसेच संजीवनने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा घेत विद्यार्थी हीच संजीवनची खरी संपत्ती आहे असे गौरवोद्गार या प्रसंगी भोसले यांनी काढले.

कार्यक्रमात संजीवन शिक्षण समूहाचे अध्यक्ष पी.आर.भोसले, उपाध्यक्ष दिलीप पवार, सचिव जी. एन. खराडे, सह-सचिव एन. आर. भोसले, खजिनदार एम. एस. लोहार, संचालक राजकुमार भोसले, किरणकुमार साळोखे, आर. डी. कांडगावकर, श्रीकांत घाटगे-सरकार, संग्राम पाटील या संचालकांचा आणि कार्यकारी संचालक सौरभ भोसले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

21 जून या जागतिक संगीत आणि योगदिनाचे औचित्य साधून संगीत विभाग प्रमुख धनंजय गुरव, मंगेश पैंजणे ,शेखर खोत , अमित सर आणि योगगुरु संजय हाके यांचा सन्मान करण्यात आला.

वर्धापन दिनाचे औचित साधून संजीवनचे माजी विद्यार्थी डॉ. राहुल पाटील, उद्योजक विनायक जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक संग्राम देवणे, चाँद फ्रूट ग्रुपचे प्रमुख साकीब बागवान, डॉ.निंगाप्पा मुरकुटे,भारतीय फुटबॉल संघात निवड झालेली खेळाडू रीनादेवी यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. 

यावेळी परदेशी असणार्‍या दुबई येथील अखिलेश सावंत, इंग्लंड येथील डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, वेट लिफ्टर रितेश गडकरी, मुंबई येथील चित्रपट पार्श्वगायक मयूर साखरे, ऋषिकेश गुरव या माजी विद्यार्थ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संजीवन ज्ञानसाधनेला शुभेच्छा दिल्या. 

  सन्मानाला उत्तर देताना डॉ. राहुल पाटील, विनायक जाधव, संग्राम देवणे आणि डॉ. निंगाप्पा मुरकुटे यांनी आपल्या मनोगतामधून संजीवनमधे ज्ञानार्जनाचे आठवणीतील दिवस आणि संजीवनमुळे जीवनात मिळालेले यश या संदर्भात मनोगत व्यक्त केले. 

सोहळ्याचे औचित्य साधून बोलताना संचालक आर.डी. कांडगावकर म्हणाले की,संजीवन ही केवळ दगड विटांची वास्तू नसून माणसांच्या संघर्षाची गाथा आहे. 

संजीवनची तीन दशकांची संघर्ष गाथा उलगडताना संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले यांनी 1994 पासून प्रचंड परिश्रम व अथक प्रयत्नांतून संजीवनची जडणघडण झाल्याचे सांगत विद्यार्थ्यी व शिक्षकांनी आजच्या युगाला अनुसरून प्रगत शिक्षण प्रणाली स्वीकारण्याचे आवाहन केले. कितीही मोठे झाला तरी संजीवनचे संस्कार आणि जन्मदात्या आई-वडिलांना विसरू नका तसेच केवळ गुणांचे स्तोम न माजवता आपल्या अभिरुचीनुसार आपले करिअर निवडा असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. 

सोहळ्यात संजीवनच्या नव्या (लोगो) बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालकांनी सादर केलेल्या नृत्याचा आविष्कार उपस्थितांचे मन जिंकणारा ठरला.

संगीत दिनाच्या औचित्याने धनंजय गुरव, मंगेश पैंजणे, चैतन्य लिपारे आणि शेखर खोत यांनी गीत गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या सोहळ्याचे संयोजन संजीवन शिक्षण समूहाच्या ज्ञानशाखांचे प्राचार्य बी. आर. बेलेकर, के. के. पोवार, शिल्पा सांगावकर-पाटील, महेश पाटील, पी. एन. पाटील, डॉ. संजीव जैन यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी व पांडुरंग गांजवे यांनी केले. आभार एन. आर. भोसले यांनी मानले. या प्रसंगी संजीवन शिक्षण समूहाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शुभचिंतक, स्नेही उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??