विधानसभा अध्यक्षांच्या मराठी उच्चारांवरून समाजमाध्यमांवर तीव्र संताप
“नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नव्हे, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला,” राज ठाकरेंकडून संतप्त प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांच्या मराठी उच्चारांवरून समाजमाध्यमांवर तीव्र संताप
“नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नव्हे, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला,” राज ठाकरेंकडून संतप्त प्रतिक्रिया
मुंबई :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. विधिमंडळाच्या सभागृहात दिवंगत गायिका, पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या मराठी भाषेच्या चुकीच्या उच्चारांमुळे समाज माध्यमांवर त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. राज्याचं सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानसभेत मराठी भाषेची झालेली ही दुरवस्था पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून विधानसभा अध्यक्षांची खरपूस शाळा घेतली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान सभागृहात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला. मात्र, हा छापील आणि लिहून दिलेला मजकूर वाचताना अध्यक्षांची मोठी तारांबळ उडाली. या संपूर्ण वाचनादरम्यान त्यांनी अनेक मराठी शब्दांचे चुकीचे उच्चार केले, ज्यामुळे वाक्यांचे अर्थ बदलले. आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव ‘दीनानाथ’ ऐवजी ‘दीनदयाल’ असा उल्लेख त्यांच्याकडून झाला. तसेच रसिकांच्या ऐवजी रेसिकांच्या, अलौकिक ऐवजी अवलोकिक, दुर्दम्य ऐवजी दुर्दमय आणि साध्या शृंगार शब्दाचा उच्चार श्रीगार असा केल्याचे समोर आले आहे. एका अहवालानुसार, या संपूर्ण मजकुरात जवळजवळ २६ चुका झाल्याचे नेटकऱ्यांनी अचूक शोधून काढले असून त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अमराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे त्यांना साधं लिहून दिलेलं मराठीही वाचता येत नाही का, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
या सर्व प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक आणि त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट लिहीत विधानसभा अध्यक्षांवर घणाघाती हल्ला चढवला. राज ठाकरे म्हणाले की, पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठीही त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही एकाच वेळी दाटून आले. वाचनापूर्वी त्या कागदातून यांनी भेळ खाल्ली होती का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी केवळ अध्यक्षांवरच नाही, तर सभागृहातील इतर ज्येष्ठ आमदारांवरही निशाणा साधला. यापूर्वी दत्तात्रय काशिनाथ कुंटे, अरुणभाई गुजराथी, बाळासाहेब भारदे आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गजांनी विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले असून त्यांनी या पदाची आणि मराठी भाषेची प्रतिष्ठा राखली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. सभागृहात अनेक ज्येष्ठ आमदार उपस्थित असतानाही या अक्षम्य चुकांवर कोणीही आक्षेप घेतला नाही, याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. अध्यक्षांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडल्यासारखे वाटले, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी सरकार आणि विरोधक दोघांचीही कानउघाडणी केली आहे. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना खुद्द विधानसभा अध्यक्षांकडूनच अशी भाषा ऐकायला मिळणे हे दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया आता सर्व स्तरांतून उमटत आहेत.



