ताज्या घडामोडी

गझलेत केवळ तंत्र नव्हे तर मंत्र सामर्थ्याची गरज गझल संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

गझलेत केवळ तंत्र नव्हे तर मंत्र सामर्थ्याची गरज गझल संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

छ.संभाजीनगर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गझल घाऊकतेची नाही तर ती भावूकतेची भुकेली आहे. गझलेचं मर्म केवळ व्याकरणाच्या सांगाड्यात नाही तर आशयाच्या आखाड्यात लपलेलं असतं.भावनेच्या ओलाव्याची नैसर्गिक जपणूक करणारा झरा आणि शब्दांची आदळआपट करून शेरांची बुंदी पाडणारा झारा यातील फरक लिहिणाऱ्यानीच लक्षात घेतला पाहिजे.रसिकांची दाद मिळायची असेल तर तिचे अंतरंग गहिरे करण्याची क्षमता गझलकारानी कमवावी लागते. ती क्षमता लिहिण्याऱ्याच्या मनोभूमीतून, व्यासंगातून आणि मांडणीच्या कौशल्यातून साकारत असते. चांगल्या गझलेसाठी केवळ तंत्रावरील हुकमत यशस्वी ठरत नाही तर त्यासाठी वाचकाची आंतरिक ऊर्जा जागृत करण्याचे मंत्रसामर्थ गझलेत आवश्यक असते

असे मत नामवंत गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी यांनी रेणुका गझल मंचच्या तिसऱ्या एकदिवसीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. येथील हाॅटेल मोदी ग्रँडच्या वातानुकूलीत सभागृहात तिसरे गझल संमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,प्राचीन काळी कवी म्हणजे समाजातील सर्वात द्रष्टा माणूस,समंजस व्यक्ती ,समाजाला नवा विचार देणारा विचारवंत असे मानले जात होते. आपली ती व्याख्या आणि आपली जबाबदारी आपण विसरता कामा नये.अलीकडे गझलेची लोकप्रियता, हृदयप्रियता, कर्णप्रियता आणि नयनप्रियताही निर्विवादपणे वाढत आहे हे सत्य आहे. म्हणजेच गझल ऐकणारे रसिक वाढत आहेत.रसिकांच्या काळजात घर करणाऱ्या गझलांचे प्रमाण वाढत आहे.रसिकांना ती अधिकाधिक ऐकाविशी वाटते आहे आणि ती तिच्या आकृतीबंधाच्या वैशिष्ट्यामुळे छापून आल्यावर डोळ्यांनी पाहायला सुद्धा सुबक वाटू लागली आहे हे वास्तव आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या अतिशय सखोल अध्यक्षीय भाषणातून गझलविषयक सांगोपांग चर्चा केली.

प्रारंभी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर यांच्या, ‘गझल ब्रह्म’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन प्रसाद कुलकर्णी यांचे हस्ते.यावेळी संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ गझलकार बापू दासरी यांनी आपल्या भाषणात, ‘ या गझल संग्रहाचे रसग्रहण केले. तर, प्रमुखपाहुणे प्राचार्य सतीश देवपूरकर यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. गझलकार जयराम कराळे डॉ.रे. भ. भारस्वाडकर यांचा सत्कार केला. उद्घाटन समारंभाचे व दिवसभराच्या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन गझलकारा सौ. प्रतिभा विभूते यांनी केले.

या गझल संमेलनात एकूण तीन गझल मुशायरा सत्रे झाली. पहिल्या गझल मुशायरा सत्राचे अध्यक्ष संजय पवार व प्रमुख पाहुणे गौतम सूर्यवंशी होते . तर सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी अतिशय उत्तम केले.दुसऱ्या गझल मुशायरा सत्राचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष प्रसाद माधव कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी बाळासाहेब गिरी हे होते.त्याचे सुरेल सूत्रसंचालन सौ. सुवर्णा अनिल मुळजकर यांनी केले. अखेरच्या तिसऱ्या गझल मुशायरा सत्राचे अध्यक्ष प्राचार्य सतिश देवपुरकर तर प्रमुख अतिथी डाॅ. प्रशांत पाटोळे हे होते . त्याचे बहारदार सूत्रसंचालन गिरीश जोशी यांनी केले.

गझल संमलनाचा समारोप व आभारप्रदर्शन डाॅ. प्रशांत पाटोळे यांनी केले. या तिन्ही मुशायऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झालेल्या अनेक प्रतिथयश व नवोदित गझलकारांनी आपल्या उत्तमोत्तम गझल रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रसाद कुलकर्णी, सतीश देवपूरकर, बापू दासरी, बाळासाहेब गिरी, डाॅ. प्रशांत पाटोळे, प्रा. डाॅ. रे. भ. भारस्वाडकर, प्रतिभा विभूते, पुष्पा वाजे, अनिकेत सागर, आत्माराम कदम, सुवर्णा मुळजकर, संजय पवार, दत्ता ठुबे-पाटोदकर, गौतम सूर्यवंशी, दीपक कुलकर्णी, जयराम कराळे, ऋषभ कुलकर्णी, अनुराधा वायकोस, अनंत देशपांडे, विलास पुंडले, पंडित वराडे, रामदास गायधने, इत्यादी गझलकारांनी आपल्या बहारदार गझला सादर करून या गझल संमेलनाची उंची वाढवली. 

रेणुका गझल मंचच्या चौथ्या गझल संमेलनाच्या आयोजनाची मागणी करून ते नाशिक येथे कुंभमेळ्यापुर्वी घेण्याचा मनोदय बाळासाहेब गिरी यांनी व्यक्त केला.एक अर्थाने ही रेणुका गझल मंचच्या यशस्वी वाटचालीची पावतीच म्हणावी लागेल. गझल संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष संजय पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रा. डाॅ. शैलेंद्र भणगे, कोषाध्यक्ष दत्ता ठुबे पाटोदेकर , मुख्य संयोजक आत्माराम कदम आणि समिती मार्गदर्शक सल्लागार गौतम सूर्यवंशी आदिंनीं  संमेलन यशस्वी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??