ताज्या घडामोडी

डीआरडीओची मोठी कामगिरी; मानवरहित विमानाद्वारे ‘V3’ मार्गदर्शित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताच्या संरक्षण सज्जतेला आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला आज आणखी एक मोठे यश

डीआरडीओची मोठी कामगिरी; मानवरहित विमानाद्वारे ‘V3’ मार्गदर्शित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

​नवी दिल्ली: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

भारताच्या संरक्षण सज्जतेला आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला आज आणखी एक मोठे यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) मानवरहित हवाई वाहनावरून (UAV) डागल्या जाणाऱ्या ‘प्रिसिजन गाईडेड मिसाईल V3’ (ULPGM-V3) या अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्राची अंतिम टप्प्यातील विकास चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूलजवळील डीआरडीओच्या चाचणी केंद्रात काल या अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या पार पडल्या.

​या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत अशा दोन्ही प्रकारच्या मारगिरीमध्ये आपली अचूक लक्ष्यभेदी क्षमता सिद्ध केली आहे. या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची रचना प्रामुख्याने रणगाडे विरोधी (अँटी-टँक) मोहिमांसह शत्रूचे लढाऊ ड्रोन, हेलिकॉप्टर्स आणि इतर हवाई लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी करण्यात आली आहे.

​काय आहेत या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये?

हे क्षेपणास्त्र ‘फायर अँड फॉरगेट’ या तंत्रज्ञानावर काम करते. यामध्ये हाय-डेफिनिशन ड्युअल-चॅनेल सीकर बसवण्यात आले असून, त्यामुळे ते दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी शत्रूच्या हलत्या व लपलेल्या लक्ष्यांचा अचूक शोध घेऊ शकते. तसेच यात ‘टू-वे डेटा लिंक’ यंत्रणा आहे, ज्यामुळे क्षेपणास्त्र डागल्यानंतरही हवेत असतानाच लक्ष्याची माहिती अपडेट करून त्याचा अचूक वेध घेता येतो. वेगवेगळ्या मोहिमांच्या आवश्यकतेनुसार यात तीन प्रकारची स्फोटक सामग्री (वॉरहेड्स) वापरण्याचा पर्याय आहे.

​भारतीय संरक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड

या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण आणि संचालन करण्यासाठी अत्याधुनिक ‘ग्राउंड Control सिस्टम’ (GCS) चा वापर करण्यात आला, जी स्वयंचलितपणे प्रक्षेपणाची तयारी पूर्ण करते. हैदराबाद येथील ‘रिसर्च सेंटर इमारात’ (RCI) या मुख्य प्रयोगशाळेने डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या चाचण्यांसाठी बंगळुरूच्या ‘न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज’ने विकसित केलेल्या मानवरहित विमानांचा (UAVs) वापर करण्यात आला होता.

​विशेष म्हणजे, या क्षेपणास्त्राच्या उत्पादनासाठी डीआरडीओने ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ (BDL) आणि ‘अडाणी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ या दोन निर्मिती संस्थांशी भागीदारी केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग राहिल्यामुळे देशांतर्गत पुरवठा साखळी पूर्णपणे सक्षम झाली असून, आता हे क्षेपणास्त्र मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी सज्ज झाले आहे.

​संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल डीआरडीओ, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सर्व औद्योगिक भागीदारांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही या यशाबद्दल सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या चमूचे कौतुक केले आहे.

व्हिडिओ सौजन्य: PB shabd

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??