आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

पोहाळे तर्फ आळते ग्रामपंचायतीचे अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन  

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

पोहाळे तर्फ आळते ग्रामपंचायतीचे अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन  

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पन्हाळा तालुक्यातील मौजे पोहाळे तर्फ आळते येथील गावठाणापासून दूर असलेल्या शेतवस्तीवरील घरांना चालू पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

​सदर निवेदनात नमूद केल्यानुसार, पोहाळे तर्फ आळते गावात मुख्य गावठाणापासून अलग असलेल्या गोपालखडी, उन्हाळे टेक, रेणुका मंदिर परिसर, माळी मळा, स्वामी समर्थ मंदिर व पाऊतका परिसर या सहा वेगवेगळ्या ठिकाणी लोकवस्त्या आहेत. या विविध वस्त्यांवर मिळून साधारण १५० कुटुंबे वास्तव्य करतात. या भागातील वीज ही शेतीची लाईट म्हणून जोडलेली असून, महावितरणकडून शेती लाईटचे बारनियमन केले जाते. सध्या पावसाळा सुरू असल्याने गावाच्या शेतवस्ती परिसरात गवे व बिबट्यासारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. परिणामी, संबंधित शेतवस्तीत वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अंधारामुळे जीवाला धोका उत्पन्न होत आहे. तसेच या ठिकाणच्या शाळकरी विद्यार्थ्यांना वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अभ्यास करणे अशक्य झाले आहे.

​विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा विचार करून, चालू पावसाळ्यात या परिसरातील वीज पुरवठ्याचे भारनियमन न करता तो अखंडित ठेवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. जर यावर तात्काळ सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पोहाळे ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

​या निवेदनावर ग्रामपंचायत पोहाळे तर्फ आळतेचे सरपंच यांच्यासह सौ. सुरेखा सतीश मोरे, श्री. आकाश बाबासो चौगुले, श्री. सुरेश विठ्ठल बिनाडे, सौ. माधुरी सुनील पवार, सौ. वैशाली दत्तात्रय पाटील आणि सौ. सुरेखा प्रसाद गायकवाड यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??