आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; राधानगरी धरणातून विसर्ग सुरू,२४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; राधानगरी धरणातून विसर्ग सुरू , २४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांत पावसाचा जोर कायम राहून एकूण सरासरी ३२.५४ मिलीमीटर पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात नोंदवला गेला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, राधानगरी धरणात ८६ टक्के म्हणजेच ७.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद आहेत.

​जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा, कासारी, भोगावती, वेदगंगा, कुंभी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी, शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी, राशिवडे, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, सांगरुळ, कळे, दत्तवाड आणि कसबा बीड असे एकूण २४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३१ फूट ८ इंच, शिरोळ ३८ फूट ८ इंच आणि नृसिंहवाडी येथे ३४ फूट ९ इंच असून तिन्ही ठिकाणी पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे. तसेच नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे पाणीपातळी १५.६ फूट इतकी नोंदवली गेली आहे.

​तालुकानिहाय पावसात हातकणंगले २३ मिलीमीटर, शिरोळ १६.९, पन्हाळा ३८.१, शाहुवाडी २०.८, राधानगरी ४७.५, गगनबावडा ५८.५, करवीर २९.४, कागल २४.२, गडहिंग्लज २८.२, भुदरगड २७.६, आजरा ३७ आणि चंदगड तालुक्यात ३९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असली तरी अतिवृष्टीमुळे २ राज्यमार्ग, २ प्रमुख जिल्हा मार्ग, ९ ग्रामीण मार्ग आणि १ इतर जिल्हा मार्ग असे एकूण १४ रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत.

​जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती पाहता, तुळशी धरणात २.३७ टीएमसी (६८ टक्के), वारणा २५.८४ टीएमसी (७५ टक्के), दूधगंगा १२.०८ टीएमसी (४८ टक्के), कासारी १.९६ टीएमसी (७० टक्के), कडवी १.८५ टीएमसी (७४ टक्के), कुंभी १.७७ टीएमसी (६५ टक्के), पाटगाव २.१८ टीएमसी (५९ टक्के), चिकोत्रा ०.७० टीएमसी (४६ टक्के), चित्री १.५३ टीएमसी (८१ टक्के), जंगमहट्टी ०.९७ टीएमसी (७९ टक्के), घटप्रभा १.५६ टीएमसी (१०० टक्के), जांबरे ०.८२ टीएमसी (१०० टक्के), आंबेआहोळ १.०१ टीएमसी (८१ टक्के), सर्फनाला ०.६७ टीएमसी (१०० टक्के), धामणी १.२९ टीएमसी (३४ टक्के) आणि कोदे लघु प्रकल्पात ०.२१ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

​या पावसामुळे जिल्ह्यात आजअखेर १ कोटी ३६ लाख ९० हजार ५०० रुपयांचे अंदाजित नुकसान झाले असून, आज नव्याने सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकाही कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलेले नाही. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??