कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरवाढीचा भडका; मुंबई, पुण्यासह राज्यभरात नवे दर लागू

अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरवाढीचा भडका; मुंबई, पुण्यासह राज्यभरात नवे दर लागू

कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

देशात आणि राज्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे ऐन लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इंधन दरांचा मोठा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांनी अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यामुळे ग्राहकांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. आज झालेल्या नव्या दरवाढीमुळे मुंबई, पुण्यासह कोकण आणि सोलापूर भागातही इंधनाचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत.

​राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०७.५९ रुपयांवर पोहोचला असून डिझेलसाठी वाहनधारकांना ९४.०८ रुपये मोजावे लागत आहेत. आयटी हब असलेल्या पुणे शहरातही पेट्रोलचे दर १०८.३४ रुपयांवर गेले असून डिझेल ९३.७८ रुपयांच्या आसपास विकले जात आहे. भौगोलिक रचनेमुळे वाहतूक खर्च अधिक असणाऱ्या रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात पेट्रोलचा दर थेट १०९.५४ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, तर डिझेलचे दरही प्रतिलिटर ९५ रुपयांच्या पार गेले आहेत. सोलापूर आणि पश्चिमेकडील इतर जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आज प्रतिलिटर १०८.४१ रुपयांच्या पातळीवर स्थिर आहे.

​दरवाढीच्या अफवेमुळे अनेक जिल्ह्यांत अभूतपूर्व इंधन टंचाई

​एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडत असताना, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत पेट्रोल आणि डिझेल मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. गेल्या चार दिवसांपासून इंधन दरात आणखी प्रचंड मोठी वाढ होणार अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या टाक्या पूर्ण भरण्यासाठी एकच गर्दी केली. मागणी अचानक प्रचंड वाढल्यामुळे आणि पुरवठा मर्यादित असल्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागासह लातूर, धाराशीव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत.

​मराठवाड्यातील आणि लगतच्या बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील १६६ पंपांपैकी केवळ काही मोजक्याच पंपांवर डिझेल उपलब्ध असल्याने तेथे वाहनांच्या व शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ऐन मान्सूनपूर्व मशागतीचे दिवस असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना डिझेलसाठी रात्री पंपावरच काढाव्या लागत आहेत, तर सीमावर्ती भागातील शेतकरी हतबल होऊन शेजारील कर्नाटक राज्याकडे धाव घेत आहेत. इंधन कंपन्यांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या या कृत्रिम टंचाईवर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??