आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

प्रसाद कुलकर्णी यांची ” प्रासादिक गझलसाद मैफल” बहारदार गझलांना रसिकांची उस्फूर्त दाद

प्रसाद कुलकर्णी यांची ” प्रासादिक गझलसाद मैफल” बहारदार गझलांना रसिकांची उस्फूर्त दाद

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

” मी गेल्यानंतर येथे गझलेला करमत नाही, गझलेला वाटत गेले गझलेची सोबत नाही, शब्दांच्या श्रीमंतीचा रखवाला झालो आहे, शब्दाला जपण्यासाठी मी शब्दच टाकत नाही ” पासून ” शब्दात कशाला सांगू ? इतकाच खुलासा

करतो, या काळजात फक्त तुला मी वावरतांना बघतो, जगण्याची गझल जहाली अन मुशायरा जन्माचा,काळीज जाळूनी माझे मी मैफल सजवत असतो ” पर्यंतचा गझल आणि शब्द यांच्या परस्परसंबंधाचा दाखला देत ” नऊ रसांच्या आस्वादाने माझी भूकच नाही भागत, मीच दहावा रस होतो अन गझले मधुनी जातो मांडत ” म्हणत” गर्द हिरवा होत जातो वाळल्यावर, मी स्वतःच्या चार गझला चाळल्यावर, कोण जाणे काय त्या पत्रात होते? कागदाचा बांध फुटला जाळल्यावर ” सारख्या विविध बहारदार गझलांतून प्रसाद कुलकर्णी यांनी ” माझी गझलसाद ” ही स्वरचित गझलांची तासभराची मैफल रसिकांची प्रचंड दाद घेत रंगवली.गझलसाद संस्थेच्या वतीने महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गझलसादचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रामध्ये झालेल्या कवीसंमेलनात प्रा.नरहर कुलकर्णी, हेमंत डांगे, अशोक वाडकर, सिराज शिकलगार, डॉ.दयानंद काळे, श्याम कारंजकर, सारिका पाटील, शेरखान तांबट, बाळकृष्ण पाटील, प्रकाश जाधव या मान्यवरांनी आपल्या बहारदार गझल आणि कविता सादर केल्या.

प्रसाद कुलकर्णी यांनी, ” उध्वस्त होत नसते येऊनही सुनामी, पण काळीज भोगते त्याचे परिणाम दूरगामी, पाण्याशी माझेही नाते ओलाव्याचे होते, पण मजला शांत करायला आगच आली कामी ” या गझलेतून मानवी मनाची आंदोलने टिपली. तर ” देवा तुझ्या समोरी ठेवून दानपेट्या, श्रीमंत जाहले ते फोडून दानपेट्या, श्रीराम जन्मभूमी श्रद्धेय स्थान आहे, गरजूस टाक रामा वाटून दानपेट्या “पासून ” ऋषीमुनींचा आशिष इतका फळास यावा ,पतंजलीच्या धामा जागी मॉल दिसावा ,चहा तसाही ब्रिटिश आहे इतिहासाने, परदेशी वा असेल देशी फुंकून प्यावा”

पर्यंत सामाजिक, राजकीय भवतालातील अस्वस्थता मांडत परिस्थितीवर व व्यवस्थेवर कोरडे ओढले. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील विविध रंगातील वीसहून अधिक निवडक गझल या मैफिलीत सादर केल्या. तसेच मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या मार्गदर्शनातून साकार झालेल्या गझललेखन प्रवासाचा पटही थोडक्यात उलगडून दाखवला. ” माझ्या आणिक शब्दांच्या नात्याची हीच कहाणी, मी अर्थ पेरतो तेंव्हा शब्दास लगडती गाणी, कित्येक योजना झाल्या मंजूर कागदावरती ,पाण्याचा प्रश्न सुटला.. प्रश्नाचे झाले पाणी ” अशा विविध रचनांना रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली.

कोल्हापूरमध्ये सुभाष नागेशकर यांच्या निवासस्थानी प्रशस्त हॉलमध्ये झालेल्या या मैफिलीला सुभाष नागेशकर, प्रशांत जोशी, डॉ. अनमोल कोठाडीया ,युवराज यादव ,सुनील पवार, प्रदीप घोडके, लक्ष्मी मोरे ,शालन कुंभार ,निनाद खाडीलकर, मकरंद सामंत, प्रकाश मोहिते,शिरीष वणकुद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. डॉ. दयानंद काळे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??