भारतीय लोकशाहीची मुळे भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानात खोलवर रुजली आहेत डॉ. सुभाष के. देसाई – अमेरिकेच्या डेनेवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भारतीय लोकशाहीची मुळे भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानात खोलवर रुजली आहेत डॉ. सुभाष के. देसाई – अमेरिकेच्या डेनेवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कोल्हापूर/एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारतीय लोकशाहीत अनेक बदल घडत आहेत, तरीही ती कधीही कोलमडणार नाही. कारण तिची मुळे भारतीय संस्कृतीत आणि तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेली आहेत. भारतीय धर्माचा पाया अहिंसा, प्रेम आणि करुणा या मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळेच हा धर्म आज युद्धात गुंतलेल्या राष्ट्रांनाही शांततेचा मार्ग दाखवू शकतो. युद्धामध्ये सर्वांत जास्त हाल महिलांचे आणि बालकांचे होतात, आणि मातृभूमी—मातृनिसर्गही जखमी होते. या तिन्हींचे संरक्षण करणे आजच्या जगासाठी अत्यावश्यक आहे, असे विचार तत्त्वज्ञानी डॉ. सुभाष के. देसाई यांनी कोल्हापूर येथे डेनेवर विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्कमधील अमेरिकन पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले, आपले विचार मांडले आणि संवाद समृद्ध केला.हा कार्यक्रम अवनी संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. आर्किटेक्ट स्कॉट, ग्रंथ भोसले, जयंत देसाई यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका प्रो. करेन ड्युजर यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले:
“भारतीय धर्म आणि जीवनाविषयी आपल्या सखोल ज्ञानाची आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल आम्ही डॉ. देसाई यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या विचारांनी आमच्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण संदर्भ मिळाला.” प्रो. निक्की अॅलन यांनीही या संवादाचे कौतुक केले.



