राज्यात आरोग्यपूर्ण गाव उपक्रम राबविणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यात आरोग्यपूर्ण गाव उपक्रम राबविणार
– सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
गारगोटीत टीबीमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सोहळा संपन्न
गारगोटी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राज्यातील नागरिक आजारी पडू नयेत आणि प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी येत्या १ जानेवारीपासून आरोग्य पूर्ण गाव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी केली. ते गारगोटी येथे आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित टीबीमुक्त ग्रामपंचायत सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलत होते. मार्केट कमिटीचे माजी सभापती कल्याण निकम, उपविभागीय संचालक दिलीप माने, जिल्हा क्षय रोग अधिकारी हर्षला वेदक आदी प्रमुख उपस्थितीत होते.
ना. आबिटकर म्हणाले, गावोगाव आशा सेविका, आरोग्य सेवक व वैद्यकीय कर्मचारी यांनी ग्रामपंचायतीशी समन्वय ठेवून घराघरात भेट देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. बहुतांश आजार हे पिण्याच्या पाण्यातून उद्भवतात, त्यामुळे ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे आणि टिसीएलचा वापर योग्य पद्धतीने करावा.आरोग्य विभागाच्या विशेष प्रयत्नांमुळे १३ हजार महिलांना कॅन्सरपासून वाचविण्यात यश आले आहे. नागरिकांनी व्यायाम, योग, प्राणायाम व संतुलित आहाराचा अंगीकार करून आजारांपासून दूर राहावे. आरोग्य संपन्न गाव मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रशासनाने लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांनी केले. या सोहळ्यास वैद्यकीय अधीक्षक पल्लवी तारळकर, सरपंच राजेंद्र देसाई, सर्जेराव देसाई, सुनिता पाटील, शुभांगी जाधव, निलम कोटकर आदींसह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


