टीईटी परीक्षा पेपर फुटीचा प्रयत्न उधळला; ७ जण अटक, १० संशयित ताब्यात,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

टीईटी परीक्षा पेपर फुटीचा प्रयत्न उधळला; ७ जण अटक, १० संशयित ताब्यात,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला.या प्रकरणी ७ आरोपी अटक व १० संशयित ताब्यात घेतले असून एकूण सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.टीईटी परीक्षा दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी होत असताना परीक्षार्थींना पेपर आधी देण्याचे आमिष दाखवून त्यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व मोठी रक्कम घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक तयार करून,मुरगूड पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने सोनगे,ता.कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉल येथे दि.23 नोव्हेंबर रोजी पहाटे १.१५ वाजता छापा टाकला व संशयितांना ताब्यात घेतले.छाप्यात विद्यार्थ्यांची मुळ कागदपत्रे, कोरे धनादेश, प्रिंटर, मोबाईल हॅण्डसेट, चारचाकी वाहन व इतर साहित्य जप्त केले असून घटनास्थळी पाच विद्यार्थी व इतर संशयित आढळून आले.पुढील तपासात परीक्षेचा पेपर मिळवून तो एजंटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कट असल्याचे उघड झाले.या प्रकरणात मुरगूड पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १० संशयितांची चौकशी सुरू आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्यासाठी स्वतंत्र पथक कराडकडे रवाना करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)पोलीस उपनिरीक्षक – जालिंदर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक – शिवाजी करे (मुरगूड पोलीस ठाणे),श्रेणी पोलीस उपनिरीक्षक – अनिल जाधव,सहभागी पोलीस कर्मचारी: युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदिप पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, रविंद्र जाधव, रघुनाथ राणभरे, भैरु पाटील, रुपेश पाटील आणि महिला पोलीस अंमलदार मिनाक्षी कांबळे. यांचा सहभाग होता.या कारवाईमुळे परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आणणारे गैरप्रकार रोखण्यात यश आले आहे.



