दादासाहेब तांदळे ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित! : लोणावळा येथे पुरस्कार वितरण संपन्न

दादासाहेब तांदळे ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित!
लोणावळा येथे पुरस्कार वितरण संपन्न
पन्हाळा :एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
जिऊर,ता.पन्हाळा या गावाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे येथील प्रसिध्द व्याख्याते व जेष्ठ साहित्यिक, माजी सरपंच दादासाहेब तांदळे यांना ग्रामविकासातील त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरी बद्दल अखिल भारतीय सरपंच परिषदेने लोणावळा येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामरत्न पुरस्कार देवून सन्मानित केले.
आ. डाॅ.विनय कोरे व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर
यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब तांदळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी गावाला एस.टी.बसची सुविधा, आठवडा बाजार, शाॅपिंग काँप्लेक्स,पाऊतका पायरी रस्ता,आंगणवाडी, सांस्कृतिक सभागृहे,दलितवस्ती योजना, घरकुले,स्मशानशेड, नळ पाणी पुरवठा योजनांतर्गत घरोघरी नळ कनेक्शन्स,रस्ते,गटर्स, वीजपुरवठा अशा नेहमीच्या विकास कामांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांंनी जिऊर, म्हाळुंगे आणि तुरुकवाडी या तिन्ही गावांतून लग्न होवून परगावी जाणार्या सर्व मुलीना ग्रामपंचायतीच्या वतीने माहेरची साडी देवून पाठवणी, कोणत्याही घरी दुःखद घटना घडल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यसंस्कार अनुदान, लेक वाचवा साठी पालकाना अनुदान, गावातील सर्व महिलांची जनधन बँक खाती ,मागासवर्गीय उद्योजकाना महामंडळां मार्फत कर्जपुरवठा, शाळकरी मुलीना सायकली व महिलाना शिलाई मशिन वितरण,दलित कुटुंबाला संसारोपयोगी भांडी,असे समाजोपयोगी अनेक वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रम राबवून त्यानी गावाला,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार,संत तुकाराम वनग्राम पुरस्कार,यशवंत आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार,निर्मल ग्राम,पर्यावरण समृद्धी पुरस्कार, असे अनेक महत्वाचे पुरस्कार मिळवून दिले होते.त्यांच्या कार्यकाळातच जिऊर गावाची राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत आणि तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांच्या यादीत निवड झाली होती. दादासाहेब तांदळे याना या पूर्वी महाराष्ट्र शासनासह, कोल्हापूर जि.प.चा आदर्श सरपंच ठाणे जि.प.चा आदर्श शिक्षक तसेच राज्यभरातील अनेक सामाजिक संस्था व संघटनानी त्याना विविध पुरस्कारानी गौरवले आहे.अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.