आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिक्षकांनी तंत्रस्नेही बनून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सज्ज व्हावे डॉ. बी .एम. हिर्डेकर


संजीवनमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवशैक्षणिक धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हाने या विषयावर व्याख्यान


एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पन्हाळा : येथील संजीवन शिक्षण समूहामध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग नियंत्रण डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे शिक्षकांसाठी राष्ट्रीय नवशैक्षणिक धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हाने या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा आरंभ सरस्वती पूजन, दीप प्रज्ज्वलन , डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख वक्त्यांच्या स्वागताने झाला.
सोहळ्याचे प्रास्ताविक संजीवन शिक्षण समूहाचे सह-सचिव एन. आर. भोसले यांनी केले.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाच्या माध्यमातून डॉ. हिर्डेकर यांनी गुरुजनांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा आणि स्वतःला तंत्रस्नेही बनवण्याचा संकल्प करावा.
शिक्षकांनी नित्य वाचन, लेखन, चिंतन आणि मनन करावे तसेच परस्परांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करून स्वतःच्या कौशल्यांचा विकास करावा आणि कीर्तीवंत विद्यार्थी घडवावेत.
शिक्षकांनी जगभरात होत असलेल्या नव संकल्पना आणि शैक्षणिक प्रयोगांचा अभ्यास करून फिनलँड सारख्या छोट्या देशाने ज्याप्रमाणे आपल्या देशाची स्वतंत्र शिक्षण व्यवस्था बनवली त्याच प्रकारे शिक्षणक्षेत्रात जागतिक पातळीवर होत असणाऱ्या विविध प्रयोगांची माहिती घेऊन आपल्या व्यावसायिक व शैक्षणिक ज्ञान व अनुभवांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा कसा होईल यासाठी प्रयत्नशील असावे.

येणाऱ्या काळात फक्त व्याख्यानाधरित शिक्षण हे उपयोगाचे राहणार नसून येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शिक्षकांनी कालसुसंगत वापर करणे अभिप्रेत आहे.
राष्ट्राचे नवशैक्षणिक धोरण
हे कौशल्याधिष्ठित विद्यार्थी घडवणारे आहे हे जाणून त्याची परिणामकारक अंमलबजावणी करणे ही शिक्षकांची जवाबदारी आहे असे हिर्डेकर म्हणाले.

या अभ्यासपूर्ण व्याख्यानानंतर संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर.भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतात संजीवनच्या तीन दशकांच्या ज्ञान प्रवासामध्ये विद्यार्थ्यांचे, पालकांचे , गुरुजनांचे आणि संजीवन परिवाराकडून मिळालेले उदंड प्रेम हीच आमची खरी मिळकत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच अशा विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने येणाऱ्या काळात शिक्षकांसाठी आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
सोहळ्याचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले. तर संजीवन विद्यालयाचे प्राचार्य महेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??