आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद : एकपात्री कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण

मानवतेचे उपासक : स्वामी विवेकानंद 
एकपात्री कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण

 



इचलकरंजी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

या सुंदर जगाचे अत्यंत नुकसान जर कशाने झाले असेल तर ते आंधळ्या धर्मावेडामुळे झाले आहे .प्रत्येक धर्मातील धर्मवेडेपणा अथवा धर्मांधता बाजूला काढली तर सर्व धर्म व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास एकच असल्याचे जाणवते. सर्वांचे अंतिम ध्येयही एकच असल्याची खात्री पटते.परंतु हे उदात्त तत्व आज समजून घेतले जात नाही. त्यासाठी संपूर्ण जगभर त्याचा प्रसार करण्यासाठी आपण सर्वधर्मीय अभ्यासू मंडळी या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत.ही धर्म परिषद सर्व धर्माचा नेमका गाभा समजून घेऊन धर्मांधतेच्या मुळावर घाव घालणारा वज्राघात ठरेल. अशी भूमिका स्वामी विवेकानंद यांनी शिकागो धर्म परिषदेत मांडली होती असे मत समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक , लेखक व ज्येष्ठ कलाकार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे ( आजरा) यांनी ” मानवतेचे उपासक : स्वामी विवेकानंद ” या एकपात्री प्रयोगाद्वारे मांडले.स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केले होते. ते भाषण म्हणजे मानवधर्माचे जागतिक जनजागरण होते. त्या ऐतिहासिक भाषणाच्या १३२ व्या वर्धापनदिनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ.नवनाथ शिंदे यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवन,विचार आणि कार्य यांची प्रश्नोत्तराच्या स्वरूपात गुंफण करून या एकपात्री प्रयोगातून प्रभावीपणे मांडणी केली. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.या एकपात्री प्रयोगाद्वारे भारतात धर्माचा शोध अविरतपणे चालू राहिला तर त्याला कधीच मरण नाही.परंतु जर राजकीय आणि सामाजिक संघर्षामध्ये त्याचा वापर केला तर त्याची अधोगती अटळ आहे. मी स्वतः एक समाजसत्तावादी आहे .समाजसत्तावादाचा पुरस्कार मी ही व्यवस्था परिपूर्ण आहे म्हणून करत नाही तर काहीच न मिळण्यापेक्षा अर्धी भाकरी तरी मिळवून देण्याची हमी या शासन प्रणालीत निश्चित स्वरूपात आहे म्हणून मी त्याचा पुरस्कार करतो. अशी अनेक विवेकानंद वचने त्याच्या समकालीन महत्वासह प्रा.शिंदे यांनी सादर केली.

स्वामी विवेकानंदांच्या वेळची ऐतिहासिक व कौटुंबिक पार्श्वभूमी, प्रबोधन चळवळीतून निर्माण झालेल्या संस्था, रामकृष्ण मिशनची स्थापना व उद्दिष्ट, विवेकानंदांचे धर्मविषयक विचार, दरिद्री नारायणाची सेवा हाच खरा धर्म, हिंदू धर्म, शिकागो धर्म परिषद, खरा धर्म, धर्मग्लानी, मानवी शरीर हेच सर्वात पवित्र मंदिर, भाकरी हाच ईश्वर, धर्मग्रंथ आणि ग्रंथप्रामाण्य, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ?, विवेकानंदांची सामाजिक भूमिका, संन्यासी म्हणजे काय ? विवेकानंद यांनी जाती व्यवस्थेला केलेला विरोध, शिवू नका वाद, भीतीच्या कल्पना, कर्माकांडातील निरर्थकता, धर्माचरण म्हणजे काय ?,शिक्षण, स्त्री विषयक दृष्टिकोन, स्वामी विवेकानंदांचे राजकीय विचार, सर्वसामान्य जनतेची उपेक्षा म्हणजे राष्ट्रीय पाप, व्यक्तिमत्व विकासाची तळमळ, देशभक्ती आणि विश्वप्रेम ,सतत पुढे चला हा दिलेला संदेश, समाज परिवर्तन, भारतीय स्वातंत्र्यलढा, जागतिक राजकारण, समाजवादाचे महत्त्व, नववेदांताचा अर्थ अशा विविध विषयांवर स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या लेखनातून भाषणातून पत्रव्यवहारातून जे विचार मांडले ते विचार प्रश्नोत्तराच्या स्वरूपात या एकपात्री प्रयोगातून डॉ. शिंदे यांनी अतिशय नेमकेपणाने मांडले आणि त्याचे समकालीन महत्त्वही सांगितले.

या कार्यक्रमास माजी आमदार राजीव आवळे, जयकुमार कोले, शशांक बावचकर,अन्वर पटेल, प्रा. रमेश लवटे, प्रा.अशोक दास, आनंदसा खोडे , मंगल सुर्वे,रिटा रॉड्रिक्स, प्रकाश सुलतानपुरे,सुषमा साळुंखे, सचिन पाटोळे ,पांडुरंग पिसे, देवदत्त कुंभार , नुरुद्दीन काजी ,नौशाद शेडवाळे, धुळगोंडा पाटील, बाळासाहेब कदम , उज्वला जाधव,चंद्रशीला अकॅडमी चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अरूण दळवी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??