पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

सर्वजण मिळून आपला शाही दसरा महोत्सव यशस्वी करूया पर्यटक-भाविकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन
महोत्सवाच्या लोगोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
कोल्हापूर, दि. 19: शाही दसरा महोत्सवाला वेगळी ओळख आणि ऐतिहासिक वारसा आहे. यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवांमध्ये कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा समावेश केल्याने आपणा सर्वांचा हा सन्मान आहे. हा महोत्सव सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नवरात्र उत्सव आणि इतर विषयांबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह आयोजन समितीचे सर्व संबंधित सदस्य उपस्थित होते.
महोत्सवाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, ‘कोल्हापूरच्या परंपरांना शोभेल अशा भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा करावा. म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणेच आपण नियोजन केले आहे. यापुढे दरवर्षी यात भर घालून अधिक उत्तम पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करावे.’ त्यांनी देश आणि राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना शाही दसरा महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांना योग्य सुविधा द्याव्यात
लाखो भाविक आणि पर्यटक नवरात्रीदरम्यान कोल्हापूर शहरात येतात. त्यांना वाहनतळापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी चांगल्या बस सुविधा उपलब्ध कराव्यात. अंतर्गत वाहतूक व्यवस्था योग्य प्रकारे राबवून प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका आणि मंदिर प्रशासनाला दिल्या. दर्शन रांगा, सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेबाबत तयारीची माहिती शिवराज नायकवडे आणि महापालिका प्रशासनाने दिली. यावेळी मंदिर परिसरात सीसीटीव्हीच्या सहाय्याने वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या नियोजनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
इतर विषयांबाबतही आढावा
यावेळी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यांबाबत आतील कामांचा कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देण्यासाठी प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच, महापालिकेने शहरातील कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरवून गुणवत्तापूर्ण कामे करावीत. येत्या काळात शहरात दृश्य स्वरूपात सकारात्मक बदल दिसतील अशी कामे हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.


