पवित्र पोर्टल शिक्षकभरतीसाठी आझाद मैदानावर शिवयुनिटी फाऊंडेशनचे आंदोलन

पवित्र पोर्टल शिक्षकभरतीसाठी आझाद मैदानावर शिवयुनिटी फाऊंडेशनचे आंदोलन
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी शिवयुनिटी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज आझाद मैदान, मुंबई येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने पात्र शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर करून भरती लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदारपणे मांडली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन प्रभावीपणे पार पडले.
आंदोलनादरम्यान शिक्षकांनी RTE कायद्यानुसार शंभर टक्के शिक्षक पदभरती तात्काळ करावी, पसंतीक्रमाची अट रद्द करून भरती प्रक्रिया सुरू करावी, तसेच सर्व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पवित्र पोर्टलद्वारेच भरती करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. याशिवाय पेसा क्षेत्र, आदिवासी विभाग, आश्रमशाळा, बहुजन कल्याण विभाग तसेच अध्यापक विद्यालय आणि कला-क्रीडा विषय शिक्षकांच्या रोस्टर तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून भरती गतीने सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली. संचमान्यतेचा कोकण पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करून मराठी शाळा वाचवाव्यात आणि शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनाच्या दरम्यान विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेतल्या. आमदार म्हात्रे, आमदार काळे, आमदार जयंत पाटील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर येथील प्रतिनिधी, आमदार रोहित पवार यांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी पाटील यांच्यासह विविध शिक्षक संघटना व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत शिक्षक प्रतिनिधींची सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षकांच्या सर्व मागण्या तपशीलवार मांडण्यात आल्या. शिक्षक प्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित करत भरती प्रक्रियेतील अडचणींबाबत चर्चा केली. शिक्षणमंत्री भुसे यांनीही या अडचणी समजून घेत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
शिवयुनिटी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या आंदोलनामुळे शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या असून, याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या हक्कांसाठी पुढील काळातही सातत्याने लढा सुरू ठेवला जाईल, असा निर्धार शिवयुनिटी फाऊंडेशनने व्यक्त केला
या आंदोलनात अध्यक्षा अॅड. बालूशा माने कार्याध्यक्ष जयदत्त क्षीरसागर सचिव बाबासाहेब बेलेकर प्रसिद्धीप्रमुख जयश्री वाबळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



