नांदणी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत

नांदणी ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत
नांदणी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव (दादा) पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नांदणी (ता. शिरोळ) येथे विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली. या आवाहनाला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आले असून ही मदत पूरग्रस्तांना देण्यासाठी गणपतराव पाटील यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली.
गेल्या महिन्याभरापासून राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचा निम्मा भाग सध्या पूर परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाऊंडेशन शाखा नांदणी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून मदत गोळा केली. यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उस्फूर्त सहकार्याची भावना ठेवून मदत दिली.
नांदणी गावातून तांदूळ 800 किलो, ज्वारी 300 किलो, गहू 250 किलो, तेल 10 बॉक्स, बिस्कीट व बेकरी खाऊ पदार्थ 20 बॉक्स, कोलगेट व साबण 5 बॉक्स, तुरडाळ व इतर डाळी 10 किलो, गूळ 10 किलो, साखर 25 किलो, आटा पीठ 10 किलो, नवीन कपडे व साड्या 2 पोती, भांडी 1 पोते व इतर जीवनावश्यक वस्तू असे साहित्य झाले होते. ही सर्व मदत श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर पूरग्रस्तांना देण्यासाठी गणपतराव पाटील यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली. उद्यानपंडित गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, प्रदीप बनगे यांच्यासह मान्यवर तसेच नांदणी मधील सा. रे. पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


