“मी संध्याकाळी गातो” : सुप्रसिद्ध संगीतकार व गायक आशुतोष कुलकर्णी यांच्या श्रवणीय गायनाने रंगली मैफल.

“मी संध्याकाळी गातो” : सुप्रसिद्ध संगीतकार व गायक आशुतोष कुलकर्णी यांच्या श्रवणीय गायनाने रंगली मैफल.
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची भावगीते व संगीत म्हणजे ख्याल आणि बंदिशीच आहेत. काळाच्या पुढे जाणारे द्रष्टेपण त्यांच्या स्वरसंगीतात ठायी ठायी दिसते असे मत सुप्रसिद्ध संगीतकार व गायक आशुतोष कुलकर्णी (पुणे) यांनी व्यक्त केले. ते सुवर्ण महोत्सवी संमेलन स्मृतीजागरचा दशकपूर्ती कार्यक्रम आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘ मी संध्याकाळी गातो ‘ या मैफलीत व्यक्त केले. त्यांना अथर्व कुलकर्णी व आनंद खळदकर यांनी हार्मोनियम व तबला यांची अप्रतिम साथ दिली.

या गानमैफलीच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व स्मृतीजागरचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशअण्णा आवाडे यांनी इचलकरंजीच्या साहित्य, नाट्य,संगीत परंपरेचा, संमेलनांचा आढावा घेऊन इचलकरंजीची ही सांस्कृतिक परंपरा अधिक विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या स्मृती जागराचा सांगता समारंभ डिसेंबर महिन्यात भव्य पद्धतीने साजरा केला जाईल असे सांगितले. स्मृतीजागरचे संकल्पक दिलीप शेंडे यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या बरोबर असलेले गेल्या चार दशकाहून अधिक काळाच्या ऋणानुबंधाचा पट उलगडून दाखविला. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रकाश आवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रकाश आवाडे यांनी दिलीप व दीपश्री शेंडे यांच्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवीवर्षाच्या पदार्पणानिमित्त त्यांचा शुभेच्छा देऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रा. रोहित शिंगे यांनी प्रास्ताविकातून सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाच्या स्मृती जागराच्या गेल्या दहा कार्यक्रमांचा आढावा घेतला.
या मैफलीमध्ये आशुतोष कुलकर्णी यांनी,”भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते,मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते”,” मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात लाभला निवांत संग “, शब्दा वाचूनी कळले सारे शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले “, “पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी “,” त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ?, त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का ?, त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का ? गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का ? “मी रात टाकली,मी कात टाकली”, लिंगोबाचा डोंगूर आभाळी, नभ उतरू आलंअशी कवी भा.रा.तांबे, ग्रेस, सुरेश भट, सूर्यकांत खांडेकर ,आरती प्रभू , ना.धों.महानोर अशा अनेक कवींची विविध अविट गोडीची व चालीची गाणी आपल्या दमदार आवाजात आणि अनोख्या अंदाजात सादर केली. तसेच भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचे मुखडे ऐकवले. आणि स्वतः संगीतबद्ध केलेली चित्रपट गीतेही सादर केली.अथर्व कुलकर्णी यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची काही गाणी सोलो पद्धतीने हार्मोनियमवर सादर केली. या मैफिलीला प्रवीण व प्रशांत होगाडे यांचे उत्तम ध्वनीसंयोजन लाभले. शेंडे यांच्या स्वानंदी निवासस्थानी अडीच तासांहून अधिक काळ रंगलेल्या या मैफलीला इचलकरंजी व परिसरातील विविध क्षेत्रातील रसिकश्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


