निवडणुकांचे बिगुल वाजले – विरोधकांचा निर्णयावर हल्लाबोल राजकीय वातावरण तापले

निवडणुकांचे बिगुल वाजले – विरोधकांचा निर्णयावर हल्लाबोल राजकीय वातावरण तापले
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क:
गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा आता संपली असून महाराष्ट्रभरातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर; दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील. कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हानिहाय यादीदेखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५
आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५
मतदान – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५
निकाल जाहीर करण्याचा दिवस – ३ डिसेंबर २०२५
उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवली! या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचायतींची यादी:
कोल्हापूर जिल्हा:- आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव.
सांगली जिल्हा :- आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा.
सातारा जिल्हा :- कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई.
दरम्यान घाईगडबडीत मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला आहे.
राजकीय पक्षांची भूमिका: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली असून, तो सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप केला आहे.
महाविकास आघाडीची भूमिका: महाविकास आघाडीनेही मतदार याद्यांमधील गैरप्रकारांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगावर टीका: घाईगडबडीत मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याबद्दल विरोधी पक्षांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

