विशेष लेख: सचिन इनामदार
कार्यकारी संपादक एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
संजीवनचे दिशादर्शक दीपस्तंभ :
प्रा. एन. आर. भोसले सर

ग्रामीण मातीतून उभे राहून उच्च शिक्षणाच्या शिखरापर्यंत पोहोचणे काही दशकांपूर्वीपर्यंत अनेकांसाठी केवळ स्वप्नवत होते. अपुऱ्या सुविधा, मार्गदर्शनाचा अभाव आणि आर्थिक मर्यादा यांमुळे असंख्य बुद्धिमान विद्यार्थ्यांची क्षमता दडपली जात होती. परंतु जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड यांची सांगड घातली तर परिस्थितीवर मात करता येते, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्सचे सहसचिव प्रा. एन.आर. भोसले.
हातकणंगले तालुक्यातील नरंदे या छोट्याशा गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील वातावरण, ग्रामीण भागातील मर्यादित साधने आणि कठीण परिस्थिती यांवर मात करत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची प्रबळ ओढ आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात स्वतःची ठाम ओळख निर्माण केली.
त्यांच्या कारकिर्दीतील पहिला महत्त्वाचा टप्पा ठरला चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय. १९८९ ते २००२ या काळात इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. ओघवती शैली, विषयातील सखोलता आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचा संवाद यांमुळे ते लवकरच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले.
सन २००२ मध्ये त्यांनी प्राध्यापकपदाची नोकरी सोडून पन्हाळ्यातील संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ बंधू पी. आर. भोसले यांना साथ देत त्यांनी संस्थेच्या उभारणीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. मुख्याध्यापक ते सहसचिव असा त्यांचा प्रवास संस्थेच्या प्रगतीशी निगडित राहिला. आज केजी ते पीजीपर्यंत विविध अभ्यासक्रमांसह हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विश्व संजीवन ज्ञानसंकुलात आकार घेत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी मिळावी, ही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. अभियांत्रिकी पदविका व पदवी, एमबीए, बीएफए यांसारखे अभ्यासक्रम ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. या उपक्रमांमुळे अनेक तरुणांना रोजगारक्षम शिक्षण मिळाले आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
सामाजिक बांधिलकी जपणे ही त्यांच्या कार्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. कन्यारत्न गौरव उपक्रमाद्वारे संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या घरी जन्मलेल्या मुलींच्या नावाने आर्थिक मदत ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य, अनाथालयांना मदत अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजाभिमुख शिक्षणाचा आदर्श ठेवला आहे.
त्यांच्या कार्याची दखल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आउटस्टँडिंग प्रिन्सिपल अवॉर्ड, बेस्ट टीचर सन्मान आदी पुरस्कारांनी त्यांच्या योगदानाचा गौरव झाला आहे. हे सन्मान केवळ वैयक्तिक यशाचे नव्हे, तर ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे प्रतीक आहेत.
इतिहास विषयाचा सखोल अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि शिस्तबद्ध प्रशासकीय दृष्टी यांचा समतोल साधत त्यांनी संस्थेला प्रगतीच्या नव्या टप्प्यावर नेले आहे. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि सहकाऱ्यांशी स्नेहपूर्ण वर्तन यामुळे ते कायम प्रेरणादायी ठरले आहेत.

ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारे, संस्थेचा पाया भक्कम बनवणारे आणि समाजाशी नाते जपणारे प्रा. एन.आर. भोसले सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचालीतही असेच यश, कार्यसिद्धी आणि प्रेरणादायी तेज लाभो, हीच सदिच्छा
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??