ऑटो न्यूज :फास्टॅग वापरकर्त्यांसाठी एनएचएआयचा मोठा निर्णय – खासगी कारसाठी १ फेब्रुवारीपासून KYV ची चिंता संपणार.

ऑटो न्यूज : फास्टॅग वापरकर्त्यांसाठी एनएचएआयचा मोठा निर्णय – खासगी कारसाठी १ फेब्रुवारीपासून KYV ची चिंता संपणार.
नवी दिल्ली :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
फास्टॅग वापरणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने आपले वाहन जाणून घ्या (केवायव्ही) प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कार, जीप आणि व्हॅन चालकांसाठी एक सुखद निर्णय घेतला आहे. आता १ फेब्रुवारी २०२६ नंतर नवीन फास्टॅग घेताना KYV प्रक्रिया करावी लागणार नाही. यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळेल.
पूर्वी फास्टॅग चालू केल्यानंतर वाहनाचे फोटो, नंबर प्लेट आणि टॅगचे फोटो अपलोड करावे लागत होते. हे न झाल्यास टॅग बंद होऊन टोल प्लाझावर अडचण येत होती. आता असा त्रास होणार नाही. जे फास्टॅग आधीच चालू आहेत, त्यांना सुद्धा नेहमी KYV करावा लागणार नाही. फक्त एखादी तक्रार आल्यासच, जसे टॅग चुकीच्या गाडीवर लावला असेल किंवा तो ढिले असेल, तेव्हाच विचारात घेतले जाईल.या निर्णयामुळे ग्राहकांचा वेळ व त्रास कमी होऊन राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
एनएचएआयच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) यांनी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवायव्ही पूर्ण न झाल्यामुळे वाहनांचे फास्टॅग तात्काळ बंद केले जाणार नाहीत. वापरकर्त्यांना केवायव्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेशी संधी दिली जाणार असून, त्यांचा एकूण अनुभव सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
नवीन नियमांनुसार कार, जीप आणि व्हॅनसाठी बाजूचे फोटो अपलोड करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता केवळ नंबर प्लेट आणि फास्टॅग स्पष्ट दिसणारा समोरचा फोटो अपलोड करणे आवश्यक असेल. तसेच वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर वाहनाची आरसी माहिती स्वयंचलितपणे उपलब्ध होणार आहे. एकाच मोबाईल क्रमांकावर अनेक वाहने नोंदणीकृत असतील, तर वापरकर्त्याला आवश्यक त्या वाहनासाठी केवायव्ही पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
केवायव्ही धोरण लागू होण्यापूर्वी जारी करण्यात आलेले फास्टॅग टॅग हरविल्याच्या किंवा गैरवापराच्या तक्रारी प्राप्त होत नाहीत तोपर्यंत सक्रिय राहणार आहेत. दरम्यान, जारीकर्ता बँकांकडून केवायव्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे स्मरण संदेश पाठवले जाणार आहेत.
जर कोणत्याही कारणामुळे कागदपत्रे अपलोड करण्यात अडचण निर्माण झाली, तर बँक कनेक्शन बंद करण्यापूर्वी संबंधित ग्राहकांशी संपर्क साधून केवायव्ही प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणार आहे. केवायव्हीशी संबंधित तक्रारी किंवा माहितीसाठी ग्राहक राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन क्रमांक 1033 वर संपर्क साधू शकतात.
फास्टॅग प्रणाली अधिक मजबूत करणे, वापरकर्त्यांचा अनुभव समृद्ध करणे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर वेगवान व सुलभ प्रवासाची सुविधा देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.



