क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात औपचारिक उद्घाटन : राज्यात केवळ मराठी भाषाच सक्तीची राहील – मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात औपचारिक उद्घाटन : राज्यात केवळ मराठी भाषाच सक्तीची राहील – मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन.

सातारा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क                                                                 

मराठी भाषा आणि जाती धर्म यांची सरमिसळ न करण्याचं आवाहन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज केलं. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालं. संमेलनाच्या अध्यक्ष पदाची सूत्रं ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून स्वीकारली. 

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग प्रमुख पाहुण्या होत्या. सर्वात पहिल्‍यांदा मराठीत दलित साहित्‍य लिहिण्‍यात आले. दलित साहित्य हा मराठी साहित्यविश्वाचा आत्मा असल्याची भावना त्यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केली. 

ग्रामीण भागातल्या प्रकाशक आणि लेखकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका मावळत्या अध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी मांडली. पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवण्याच्या निर्णयाला साहित्यिक जगताचा विरोध असल्याचंही त्या म्हणाल्या. साहित्य महामंडळाचे सचिव मिलिंद जोशी यांनी त्याला दुजोरा दिला. 

 मुख्यमंत्री असताना मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन दिली. साहित्यिकांनी राजकारणात यावे; मात्र साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नये, असं ते म्हणाले. साहित्य जनजीवनाचं दर्शन घडवतं आणि समाजाला वळण लावतं. त्यामुळे संमेलनाच्या मंचावरुन झालेली टीका महत्त्वाची असं त्यांनी सांगितलं. राज्यात केवळ मराठी भाषाच सक्तीची राहील, हिंदी किंवा इतर भाषा शाळेत शिकवण्याबाबत नरेंद्र जाधव समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेऊ असं ते म्हणाले. 

यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर, जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??