डॉ. सुनंदा शेळके यांचा इंग्रजी कथासंग्रह प्रकाशित

डॉ. सुनंदा शेळके यांचा इंग्रजी कथासंग्रह प्रकाशित
जयसिंगपूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर येथील डॉ. सुनंदा शेळके या निसर्गप्रेमी कवयित्री, लेखिका, गझलकार तसेच ललित लेखिका म्हणून सर्वपरिचित आहेतच. त्या सध्या बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
त्यांचे ‘द जंगल स्टोरीज’ हे पुस्तक काव्या पब्लिकेशन, दिल्ली यांचेकडून नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात निसर्ग हा मानवाचा खरा आधार आहे आणि त्याच्याशी प्रेमाचे नाते जपणे आपले कर्तव्य आहे. जंगले ही पृथ्वीची फुफ्फुसे असून ती आपल्याला प्राणवायू, पाणी आणि जीवन देतात. झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे म्हणजे भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण करणे होय असा संदेश दिला आहे.
प्राणी हे निसर्गसाखळीचे महत्त्वाचे घटक असून त्यांचे संरक्षण झाल्याशिवाय पर्यावरण संतुलित राहू शकत नाही. जंगलतोड, प्रदूषण आणि अति मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन आर्या नावाच्या मुलीच्या पात्राच्या माध्यमातून या कथा पुढे सरकत राहतात. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आपापल्या परीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असा संदेश देणाऱ्या कथा या संग्रहामध्ये आहेत. पुढील पिढीला त्या दृष्टीने घडवायचे असेल तर शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या कथा लिहिल्या आहेत. निसर्गावर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करणे होय. निसर्ग सुरक्षित राहिला तरच मानवजातीचे भविष्य उज्वल राहू शकेल या भूमिकेतून प्रबोधन करण्यासाठी त्यांनी या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
लवकरच त्यांचे ‘जंगल कथा’ हे मराठी पुस्तकही प्रकाशित होत आहे. बहुदा मराठी लेखकांचे पुस्तक आधी मराठीत प्रसिद्ध होते व पुढे इंग्रजीत अनुवादले जाते पण डॉ. सुनंदा शेळके यांचे मूळ पुस्तक इंग्रजीत आले असून आता त्याचा मराठी अनुवाद प्रसिद्ध होत आहे.
डॉ. सुनंदा शेळके यांच्या ‘गझलगंध’ या गझलसंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेने’ सिध्दमाला ढगे स्मृती पुरस्काराने गौरवले होते. डॉ. सुनंदा शेळके या महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेच्या सहयोगी व मार्गदर्शिका आहेत. त्यांचे शाखेच्यावतीने तसेच सर्वच साहित्यक्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.



