आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कोल्हापूरमध्ये संजीवन कलावात्सल्य चित्रकला प्रदर्शनाचा शुभारंभ.                         

कोल्हापूरमध्ये संजीवन कलावात्सल्य चित्रकला प्रदर्शनाचा शुभारंभ.                         

कोल्हापूर:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पन्हाळा येथील संजीवन शिक्षण समूहाच्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ( बी. एफ. ए. ) कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे संजीवन कलावात्सल्य महोत्सव हे चित्रकला प्रदर्शन शाहू स्मारक कलामंदिराच्या मिनी हॉलमध्ये सुरू झाले. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्जवलनाने झाला.  

स्वागत आणि प्रास्ताविक बी. एफ. ए. चे विभाग प्रमुख प्रा.योगेश साटम यांनी केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव जैन यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक केले आणि पुढील वर्षीची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा पन्हाळा येथील संजीवन ज्ञानसंकुलामध्ये आयोजित केली जावी अशी इच्छा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शिल्पा पाटील सांगावकर याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की संजीवनच्या युवा कलाकारांची साकारलेली चित्रे छापील वाटवीत इतकी बोलकी आहेत. विद्यार्थ्यांना संबोधित करताना संजीवन शिक्षण समूहाचे सह-सचिव एन. आर.भोसले म्हणाले बी. एफ. ए. कॉलेज सुरू करण्यामध्ये संजीवन व्यवस्थापनाला शिवाजी विद्यापीठाचे अनमोल सहकार्य लाभलेले आहे. चित्रकला ही आजच्या काळातील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अत्यंत लाभदायी क्षेत्र आहे तथापि या संदर्भात शहरी तसेच ग्रामीण भागामधील पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रबोधित करणे गरजेचे आहे. पुढील वर्षीचा संजीवन कला वात्सल्य महोत्सव कुलसचिवांच्या पाठिंब्याने शिवाजी विद्यापीठामध्ये मोठ्या पातळीवर आयोजित केला जाणार आहे असेही भोसले म्हणाले.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. व्ही एन शिंदे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतामधून विद्यार्थ्यांना जगातील महान चित्रकारांची चरित्रे वाचण्याचे आवाहन केले. शिंदे म्हणाले महान चित्रकार लिओनार्डो दा विंची म्हणायचे विज्ञान हे सर्व कलांची राणी आहे या अनुषंगाने डॉ. होमी जहांगीर भाभा, डॉ. विक्रम साराभाई, आईन्स्टाईन असे महान शास्त्रज्ञ देखील विविध कला जोपासत असत. कलाकार हा कला आकार अर्थात उद्याच्या भविष्याला आकार देणार असतो. आजच्या यंत्र आणि तंत्र युगात कलेचा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे. कलाकाराकडे सौंदर्य पाहण्याची दृष्टी असेल तर धोतऱ्याच्या फुलांमध्ये देखील सौंदर्य दिसते असे शिंदे या प्रसंगी म्हणाले. 

अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झालेल्या सोहळ्याचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी आणि आभार प्रदर्शन प्रा.प्रिया पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे संयोजन कलाशिक्षक आणि चित्रकार नितीन गावडे यांनी केले. याप्रसंगी संजीवन डिप्लोमा विभागाचे प्राचार्य थरकार, संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन अकॅडमीक्स एकनाथ साळोखे, बी. एफ. ए. चे सर्व शिक्षक ,विद्यार्थी आणि कोल्हापूर शहरातील कलाप्रेमी उपस्थित होते.

 या प्रसंगी ज्ञानेश पवार, आशुतोष कोष्टी, मंजिरी काळे, सायली गाढे, गायत्री धोकटे, सृष्टी माळी, मधुरा मगदूम, शिवानी प्रसाद, राजवर्धन चव्हाण या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमधील यशाप्रित्यर्थ गौरव करण्यात आला. साक्षी अलगुडे आणि रसिका घोरपडे यांना स्कॉलर विद्यार्थिनी म्हणून गौरवण्यात आले. शिवम काळे या विद्यार्थ्याने म्हैसूर येथे संपन्न झालेल्या विद्यापीठीय कला स्पर्धेमध्ये झोनल पातळीवर यश प्राप्त केल्याबद्दल त्याचा विशेष गौरव करण्यात आला.

 कलावात्सल्य महोत्सव 19 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत सुरु आहे. या महोत्सव अंतर्गत नामवंत कलाकार चित्रकला आणि  सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. 

संजीवन कलावात्सल्य महोत्सवाचा कोल्हापूर आणि पंचक्रोशीमधील कलाप्रेमीनीं लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.कलामहोत्सवाला संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??