आमदार रोहित पवार यांची श्री दत्त साखर कारखान्याला सदिच्छा भेट

आमदार रोहित पवार यांची श्री दत्त साखर कारखान्याला सदिच्छा भेट
शिरोळ:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळी सदिच्छा भेट दिली. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक करून लवकरच क्षारपड मुक्ती कामाची विस्तृत माहिती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार रोहित पवार हे वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त शिरोळ तालुक्यात आले होते. श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळी त्यांनी सदिच्छा भेट दिली. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यामध्ये झालेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची यशोगाथा सांगितली. दहा हजार एकरावर क्षारपड मुक्तीचा हा प्रकल्प यशस्वी झाला असून चार हजार एकरावरती शेतकरी प्रत्यक्षात उत्पादन घेत असल्याचे सांगितले. कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, सुपर केन नर्सरी, माती पाणी पाने परीक्षणाचा अहवाल, अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाची तांत्रिक माहिती दिली. आमदार रोहित पवार यांनी हे काम निश्चितच कौतुकास्पद असून थोड्याच दिवसात या कामाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक दरगु गावडे, महेंद्र बागे, अशोकराव कोळेकर, रावसाहेब भिलवडे, विजयसिंह जगदाळे, दिलीप पाटील कोथळीकर, नितीन बागे, वरुण पाटील, पंडितराव काळे, बी. जी. माने, अंबादास नानिवडेकर, ए. एस. पाटील, अमर चौगुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.



