आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक, गुप्तांना पदोन्नती

निलोत्पल कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक, गुप्तांना पदोन्नती

कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठा फेरबदल झाला असून, जिल्ह्याला आता नक्षलविरोधी मोहिमेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ‘धडाकेबाज’ अधिकारी मिळाले आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची पदोन्नतीवर बदली झाली असून, त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निलोत्पल हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून गडचिरोलीत त्यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे ते विशेष चर्चेत राहिले. त्यांच्या कार्यकाळात अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. आता कोल्हापूरसारख्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

गेल्या वर्षभरापासून कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत असलेले योगेश कुमार गुप्ता यांची आता गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. गुप्ता यांनी कोल्हापूरमधील आपल्या कार्यकाळात अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास यशस्वीपणे हाताळला होता.

राज्य गृह विभागाने सोमवारी रात्री उशिरा काढलेल्या आदेशानुसार राज्यातील एकूण ९ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये साताऱ्याचे अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीत, तर सांगलीचे संदीप घुगे यांची मुंबईत रवानगी झाली आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आता साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय फेरबदल म्हणून या बदल्यांकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??